वृत्त विशेषनिवडणूकविधानसभा

पदवीधर मतदारसंघ – Graduate constituency

उमेदवारी अर्ज भरण्याच्या टप्प्यापर्यंतही मतदार नोंदणी चालूच असते. फरक इतकाच की इतर निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून सातत्याने मतदार नोंदणी आणि अद्ययावतीकरण होत असते. पदवीधर मतदारसंघासाठी मात्र दरवेळेस नव्याने नोंदणी करावी लागते. मात्र पदवीधर मतदार संघ म्हणजे काय? या मतदार संघाचे महत्त्व काय? या मतदार संघाच्या निवडणुका कशा होतात? आणि अधिकाधिक पदवीधर मतदारांनी या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्याची गरज का आहे? याबद्दल अगदी सुशिक्षितांनाही माहिती नसते हे वास्तव आहे. त्यामुळेच याबाबत निवडणूक आयोग, शासन आणि प्रसारमाध्यमांकडून व्यापक प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे.

भारतीय घटनेच्या १७१ व्या कलमामध्ये विधानपरिषदेचा उल्लेख आहे. विधानपरिषद हे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे. ज्या राज्यांमध्ये विधानपरिषद आहे, तिथल्या विधानपरिषदेच्या एकूण संख्येपैकी जवळजवळ एक बारांश सदस्य हे भारताच्या कोणत्याही राज्यातील, कोणत्याही विद्यापीठाचे किमान तीन वर्षे आधी पदवीधर असलेले किंवा विद्यापीठाच्या पदवीधरांशी समकक्ष असलेल्या पदव्या असलेले नागरिक निवडून देतात. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेमध्ये एकूण ७२ सदस्य आहेत. त्यापैकी सहा सदस्य पदवीधर मतदारसंघातून येतात. मुंबई पदवीधर मतदारसंघ हा त्यापैकीच एक मतदारसंघ आहे. सबंध मुंबई शहर मिळून हा मतदारसंघ तयार होतो. म्हणजे पश्चिम उपनगरांमध्ये दहिसरपर्यंत, पूर्व उपनगरांमध्ये मुलुंडपर्यंत आणि हार्बर मार्गावर मानखुर्दपर्यंत हा मतदारसंघ पसरलेला आहे. एवढ्या मोठ्या टापूत विधानसभेचे ३६ मतदारसंघ येतात. मतदारसंघ पदवीधरांचा असला तरीही उमेदवार पदवीधरच असला पाहिजे अशी सक्ती नाही.

लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून सातत्याने मतदार नोंदणी होत असते. त्यासाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी घरोघर जातात. मतदार ओळखपत्रे तयार करण्याची प्रक्रिया गेली अनेक वर्षे चालू आहे. राजकीय पक्षसुद्धा या निवडणुका म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न असल्याने आपला संभाव्य मतदार यादीमध्ये यावा यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात. त्यामुळे निवडणूक आयोगसुद्धा याबाबतीत अतिशय जागरूक असतो. त्यामानाने पदवीधर मतदार संघामध्ये शिकल्या सवरलेल्या मंडळींचे मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आणि प्रत्यक्षात मतदानासाठी बाहेर पडण्याचे प्रमाण अत्यल्प असते. या निवडणुका सहा वर्षांतून एकदा होतात. त्यांचे आणि इतर सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जुळत नाही. या निवडणुकांसाठी निवडणुकांची अधिसूचना जाहीर झालेल्या तारखेआधी तीन वर्षे पदवीधर झालेला / झालेली कोणीही व्यक्ती मतदार म्हणून चालते. याचा अर्थ निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यादिवशी एखाद्याने पदवीधर होऊन तीन वर्षांपेक्षा थोडासाही कमी कालावधी झाला असेल तर ती व्यक्ती मतदानास अपात्र ठरते. आणि त्यामुळे त्या मतदाराला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पुढची सहा वर्षे थांबावे लागते.

सर्वसामान्य भारतीय नागरिकाला वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे, आणि त्यासाठी ज्यावर्षी निवडणूक आहे त्यावर्षीची १ जानेवारी ही तारीख मतदार नोंदणीसाठी आधारभूत ठरवली जाते. त्यामुळे पात्र मतदारांची संख्याही वाढते. इतर मतदार यांद्यांमध्ये सातत्याने बदल होत राहतात, त्यांचे अद्ययावतीकरण होत राहते. पदवीधर मतदारसंघासाठी सुद्धा याआधी तशीच तरतूद होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने १२ जानेवारी २०१६ रोजी दिलेल्या निर्णयाप्रमाणे या निवडणुकीसाठीची मतदार यादी प्रत्येक निवडणुकीत नव्याने करायची आहे. मुंबई पदवीधर मतदार संघाच्या २५ जून २०१८ रोजी झालेल्या निवडणुकीच्या मतदार नोंदणीची अधिसूचना २८ सप्टेंबर २०१७ रोजी जाहीर झाली होती. या अधिसूचनेप्रमाणेच मुंबई पदवीधर मतदारसंघासाठीची मतदार नोंदणी सुरू झाली होती. निवडणुकीचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या जाहिरातीनुसार मुंबईतल्या ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार नोंदणीसाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. निवडणूक २५ जून २०१८ला झाली. पुढची निवडणूक ६ वर्षांनी होईल.

या निवडणुकीच्या मतदार नोंदणीचा तपशील https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पदवीधर मतदारसंघामध्ये मतदार म्हणून नाव नोंदण्यासाठीचा अर्ज क्र. १८ सोबत दिलेल्या दुव्यावर उपलब्ध आहे. https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/pdf/Form18_Marathi_English.pdf सध्या मुंबई शहरात राहणारा, तीन वर्षे आधी पदवी मिळालेला कोणीही पदवीधर मतदार म्हणून पात्र आहे. आपल्याला मिळालेली पदवी, पदविका या पात्रतेत बसते की नाही हे ज्या मतदारांना तपासून पाहायचे असेल त्यांनी https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/PDF/Instruction_Graduate_2017oct.pdf या दुव्यावर जाऊन तिथे दिलेल्या पदव्यांच्या यादीमधून खातरजमा करून घ्यायची आहे. बरेचदा पदवीधर मंडळी मतदार नोंदणीसाठी आणि त्यातही विशेषतः अर्ज भरण्यासाठी आळस करतात. विधानसभा आणि पदवीधर मतदारसंघाची तुलनात्मक आकडेवारी पाहिली तर हा फरक कुणाच्याही प्रकर्षाने लक्षात येईल.

मुंबईतल्या ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये विजेत्या उमेदवाराला सरासरी ५० ते ८० हजार मते मिळतात. म्हणजे सर्व विजेत्या मतदारांच्या मतांची बेरीज पंचवीस लाखांहून अधिक होते. मात्र संबंध मुंबईभर पसरलेल्या पदवीधरांच्या मतदारसंघामध्ये २०१२ च्या निवडणुकीमध्ये विजेत्या उमेदवाराला १५ हजारांहून कमी मते मिळाली होती. याचा अर्थ शिकलेला वर्ग या मतदान प्रक्रियेपासून अज्ञान किंवा उदासीनतेमुळे कमालीचा दूर आहे.

मतदार यादी तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाने कालमर्यादा घालून दिलेली असली तरी प्रत्यक्षात संघटित राजकीय पक्षांकडून होणारी नोंदणी वगळता स्वतंत्रपणे केली जाणारी नोंदणी फारच किरकोळ असते. इतर निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने मतदार जागृतीचे कार्यक्रम सातत्याने हाती घेतले जातात तसे या निवडणुकीच्या बाबतीत घडत नाही. अनेक पदवीधरांकडे त्यांची प्रमाणपत्रे नीट ठेवलेली नसतात, किंवा या मतदानाचा अर्ज भरावा यासाठी ती शोधणे त्यांना महत्त्वाचे वाटत नाही. त्याचाही परिणाम मतदार नोंदणीवर होतो. एक लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे ही निवडणूक मतदान यंत्रावर होत नाही, तर मतपत्रिकेवर होते. मतपत्रिकेवर असलेल्या उमेदवारांच्या नावापुढे १, २, ३ असा पसंती क्रम देऊन मतदान करायचे असते.

घटनाकारांनी समाजातल्या शिक्षित वर्गाचे प्रतिनिधित्व संसदीय व्यासपीठावर व्हावे यासाठी विचारपूर्वक या मतदारसंघाची रचना केली आहे. मात्र गेली काही वर्षे आपल्या कार्यकर्त्यांची सोय लावण्याच्या प्रयत्नांत असलेल्या राजकीय पक्षांनी विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त प्रतिनिधींच्या जागांप्रमाणेच पदवीधर मतदारसंघही बळकावून टाकले आहेत. त्यामुळे शिकलेल्या तरुणांचे नोकरी, रोजगार धंद्याचे प्रश्न, मातृभाषेतून उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांसमोर उभी राहणारी आव्हाने आणि जागतिकीकरणानंतर शिक्षितांपुढे निर्माण झालेले प्रश्न यांसारख्या कळीच्या प्रश्नांची चर्चाच विधिमंडळात होत नाही. पदवीधर मतदारसंघातून होणाऱ्या प्रतिनिधित्वाची अशा रीतीने झालेली कोंडी फुटायला हवी. शिक्षित, पदवीधर मतदार लोकशाही प्रक्रियेबद्दल सजग आणि सक्रिय होणे महत्त्वाचे आहे. मतदार जागरूक झाला तरच लोकशाही व्यवस्था पारदर्शक आणि सक्षम होऊ शकेल.

हेही वाचा – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकींसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत शासन परिपत्रक जारी

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “पदवीधर मतदारसंघ – Graduate constituency

  • hemanatkumar raghunath koli

    integrated degree काही विद्यार्थांनी काही कारणास्तव पदवी प्राप्त करू न शकलेल्या आणि मुक्त विद्यापीठाकडून प्राप्त केलेल्या पदवीधर मतदारांना मतदार नोंदणी आणि मताचा अधिकार निवडणूक आयोगाने दिला पाहिजे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.