महाराष्ट्र लोक आयुक्त कडे तक्रार कशी दाखल करावी? – Maharashtra Lokayukta
ऑम्बुडस्मन ही स्कॅन्डीनेव्हीयन संकल्पना आहे. ऑम्बुडस्मनचे कार्यालय स्वीडन मध्ये सन 1809 पासून आणि फिनलॅंन्ड मध्ये 1919 पासून अस्तित्वात आहे. डेन्मार्कने सदर व्यवस्था सन 1955 पासून सुरु केली, तर नॉर्वे व न्युझिलँड यांनी ती सन 1962 पासून स्वीकारली. युनायटेड किंगडमने प्रशासनासाठी संसदीय आुयक्ताची नेमणूक सन 1967 मध्ये केली. जगातील अनेक देशांनी ऑम्बुडस्मन सारख्या संस्थांची संकल्पना स्वीकारली आहे.
स्व. मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय सुधारणा आयोगाने सन 1966 मध्ये केलेल्या शिफारशींना अनुसरुन लोक आयुक्त संस्थेची स्थापना करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून सदर संस्थेची स्थापना महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त अधिनियम, 1971 या अधिनियमाद्वारे करण्यात आली. प्रशासकीय सुधारणा आयोगाने आपल्या अहवालामध्ये नागरिकांच्या गाऱ्हाण्याचे निवारण करण्यास तत्कालीन व्यवस्था अपूरी पडत असल्याचे ठळकपणे निदर्शनास आणले व जनतेतील असंतोष दूर करणे, भ्रष्टाचाराला आळा घालणे, जनतेच्या तक्रारींवर सत्वर उपाय मिळवून देणे आणि लोकांमध्ये प्रशासकीय सेवेच्या सचोटी व कार्यक्षमतेबद्दल विश्वास निर्माण करणे याकरिता ऑम्बुडस्मन सारखी संस्था निर्माण करण्याची शिफारस केली होती.
महाराष्ट्रात लोक आयुक्त संस्था दिनांक 25 ऑक्टोबर, 1972 पासून अस्तित्वात आली आणि जवळ जवळ 60 ते 70 टक्के तक्रारीतील गाऱ्हाण्यांचे निवारण करण्यात ती नेहमीच यशस्वी ठरली आहे.
महाराष्ट्र लोक आयुक्तकडे तक्रार कशी दाखल करावी?
लोक आयुक्त व उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र लोक आयुक्त व उप लोक आयुक्त अधिनियम, 1971 च्या कलम 2(के) मध्ये दिलेल्या लोकसेवकाच्या व्याख्येमध्ये नमूद केलेल्या लोकसेवकांविरूध्द तक्रार ई-मेलने किंवा पोष्टाने किंवा समक्ष या कार्यालयात उपस्थित राहून दाखल करता येते. तक्रारदाराने त्यांच्या तक्रारीसंदर्भात प्रथम संबंधित लोकसेवकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्यांच्या तक्रारीसंदर्भात दाद मागणे आवश्यक आहे.तसेच त्या व्यतिरिक्त तक्रारदाराला इतर उपाययोजना उपलब्ध असल्यास त्याचा त्यांनी अवलंब करणे आवश्यक आहे.
या कार्यालयात दाखल करण्यात येणाऱ्या तक्रारी गाऱ्हाणे किंवा अभिकथन म्हणजेच आरोपाच्या स्वरुपात असतात. गाऱ्हाण्याच्या तक्रारीतील कारवाई तक्रार करणाऱ्यास माहिती झाल्याच्या तारखेपासून 12 महिन्यांपर्यंत व आरोपाच्या तक्रारीतील कारवाई केल्याचे अभिकथित करण्यात आले असेल त्या तारखेपासून 3 वर्षांचा कालावधी संपण्यापूर्वी त्या कारवाईविरूध्द या कार्यालयात तक्रार दाखल करता येते. विहित कालमर्यादेत गाऱ्हाणे स्वरुपाची तक्रार दाखल करणे शक्य न झाल्यास विलंबाच्या पुरेशा कारणासह निवेदन तक्रार अर्जासोबत सादर केल्यास तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब क्षमापित करण्याबाबत तरतूद आहे.
या कार्यालयात तक्रार विहित नमुन्यातच दाखल करणे आवश्यक नाही. परंतु या कार्यालयात तक्रार दाखल करताना त्यांनी तक्रार अर्जात त्यांचे संपूर्ण नाव व पत्रव्यवहाराचा पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक किंवा इतर संपर्क क्रमांक, ई-मेल असल्यास ईमेल आय डी नमूद केलेला असावा. प्रत्येक तक्रारीवर तक्रारदाराने रितसर स्वाक्षरी व जर तक्रारदार निरक्षर असेल तर दुसऱ्या एखादया साक्षर व्यक्तीच्या सहीने साक्षांकित केलेल्या तक्रारदार यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा स्वाक्षरीच्या जागी उमटविलेला असणे आवश्यक आहे. तक्रारदाराने या कार्यालयात तक्रार अर्ज सहपत्रासह दोन प्रतीत व त्यासोबत तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांकडे केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रतीसह दाखल करणे आवश्यक आहे. तसेच तक्रारदारांची अभिकथन / आरोपाबाबत तक्रार असल्यास त्यांनी लोकसेवकाविरुध्द केलेल्या आरोपांच्या समर्थनीय सक्षम प्राधिकाऱ्यासमोर साक्षांकित केलेले मूळ शपथपत्र व जेवढ्या लोकसेवकांविरूध्द आरोप केले आहेत तेवढ्या तक्रार अर्जाच्या सहपत्रासंह प्रती या कार्यालयास सादर करणे सक्तीचे राहील.
लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे अधिकारकक्षेत खालील बाबी संदर्भात हस्तक्षेप करता येणार नाही-
- पोलीसांनी गुन्हा किंवा राज्याची सुरक्षता जपण्याच्या अन्वेषणार्थ केलेली कारवाई,
- न्यायालयाकडे उपाययोजना करणे शक्य आहे अशी कारवाई,
- प्रशासनाच्या, ग्राहकांशी किंवा पुरवठाकारांशी असलेल्या केवळ वाणिज्यिक संबंधाचे नियमन करणाऱ्या संविदेच्या अटीतून उदभवतील अशा बाबींच्या संबधात केलेली कारवाई,
- सेवाशर्तीशी निगडित असलेल्या बाबी,
- सन्मान चिन्हे व पुरस्कार देणेबाबतचे धोरण.
तसेच लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 19 मध्ये व्याख्या केलेल्या कोणत्याही न्यायाधीश, न्यायालयातील कर्मचारी/अधिकारी, महाराष्ट्र महालेखापाल, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त, निवडणूक आयुक्त व प्रादेशिक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष किंवा विधानपरिषदेचा सभापती, विधान मंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या सचिवालयीन कर्मचारीवर्गापैकी कोणताही कर्मचारी यांनी केलेल्या किंवा त्यांच्या मान्यतेने केलेल्या कोणत्याही कारवाईचे अन्वेषण करण्याचे अधिकार नाहीत.
महाराष्ट्र लोकआयुक्त आणि उप लोकआयुक्त नियम, 1974 मधील अनुसूची ‘अ’ तक्रार नमूना :
प्रत्येक तक्रार ही महाराष्ट्र लोकआयुक्त आणि उप लोकआयुक्त नियम, 1974 मधील अनुसूची ‘अ’ मध्ये करणे नियमांनुसार अपेक्षित आहे. त्याचा नमूना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
(I) तक्रार अर्जामध्ये पुढीलप्रमाणे तपशील नमूद करणे आवश्यक आहेः-
- तक्रारदार व्यक्तीचे नाव आणि पत्ता
- ज्याच्याविरूध्द गाऱ्हाणे किंवा आरोप असेल त्या लोकसेवकाचे नाव आणि पत्ता,
- ज्या आदेशाविरूध्द तक्रार असेल त्याच्या तारखेपासून बारा महिन्यांनंतर गाऱ्हाणे असलेली तक्रार केली असेल त्याबाबतीत, तक्रारदार व्यक्तीस ज्याविरूध्द तक्रार केली ती कृती ज्या दिवशी माहीत झाली असेल, ती तारीख आणि कलम 8(5) (अ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीत तक्रार न करण्याच्या पुरेशा कारणांचे निवेदन.
- प्रत्येक तक्रार ही फुलस्केप कागदाच्या एका बाजूकडील एक चतुर्थांस समास सोडून टंकलिखित अथवा सुवाच्च हस्ताक्षरात असावे.
- (II)
- तथापि मा. लोकआयुक्त / उप लोकआयुक्त यांच्या आदेशानुसार विहित नमुन्यात तक्रार अर्ज / शपथपत्र सादर करण्यात सूट देता येईल.
- महाराष्ट्र लोकआयुक्त व उप लोकआयुक्त अधिनियम, 1971 च्या कलम 9(3) नुसार, पोलिस अभिरक्षेमध्ये किंवा तुरुंगामध्ये किंवा वेड्या व्यक्तींसाठी असलेल्या कोणत्याही उपचार गृहांमध्ये किंवा अशा इतर ठिकाणी, असलेल्या व्यक्तीने लोकआयुक्त अथवा उप लोकआयुक्त यांच्या नावे पाठविलेल्या तक्रारीस उपरोक्त औपचारीकता लागू ठरणार नाही. तथापि मा. लोकआयुक्त / उप लोकआयुक्त यांनी आदेश दिल्यास अशा व्यक्तींना विहित नमून्यात तक्रार अर्ज अथवा शपथपत्र (यथास्थिती) सादर करावे लागेल.
शपथपत्र नमुना: शपथपत्र नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- प्रत्येक शपथपत्र सुस्पष्ट, सुवाच्च, वाचणाऱ्यास समजेल अशा भाषेत लिहिलेले असावे.
- प्रतिज्ञापत्राचे लिखाण हे प्रथम पुरूषी असावे व क्रमांक देऊन परिच्छेदनिहाय असावे.
- प्रत्येक परिच्छेद निराळ्या विषयापुरता किंवा भागापुरता मर्यादित असेल.
- या कार्यालयात सादर करावयाचे शपथपत्र लोकआयुक्त आणि उप लोकआयुक्त कार्यालयाचे निबंधक अथवा सहाय्यक निबंधक अथवा शपथ देण्यास वैधरित्या प्राधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर शपथ घेऊन करण्यात येईल.
- प्रत्येक शपथपत्र हे प्रत्येक पानाचा एक चतुर्थांश भाग समास सोडून फुलस्केप कागदाच्या फक्त एकाच बाजूस टंकलिखित केलेले अथवा सुवाच्च हस्ताक्षरात लिहिलेले असावे.
- तथापि मा. लोकआयुक्त / उप लोकआयुक्त यांच्या आदेशानुसार विहित नमुन्यातील तक्रार अर्ज / शपथपत्र सादर करण्यात सूट देता येईल.
- महाराष्ट्र लोकआयुक्त व उप लोकआयुक्त अधिनियम, 1971 च्या कलम 9(3) नुसार, पोलिस अभिरक्षेमध्ये किंवा तुरुंगामध्ये किंवा वेड्या व्यक्तींसाठी असलेल्या कोणत्याही उपचार गृहांमध्ये किंवा अशा इतर ठिकाणी, असलेल्या व्यक्तीने लोकआयुक्त अथवा उप लोकआयुक्त यांच्या नावे पाठविलेल्या तक्रारीस उपरोक्त औपचारीकता लागू ठरणार नाही. तथापि मा. लोकआयुक्त / उप लोकआयुक्त यांनी आदेश दिल्यास अशा व्यक्तींना विहित नमून्यात तक्रार अर्ज अथवा शपथपत्र (यथास्थिती) सादर करावे लागेल.
पुराव्याचे कागदपत्र / दस्तऐवज महाराष्ट्र लोकआयुक्त आणि उप लोकआयुक्त नियम, 1974 मधील अनुसूची ‘ब नमुना:
पुराव्याचे कागदपत्र / दस्तऐवज महाराष्ट्र लोकआयुक्त आणि उप लोकआयुक्त नियम, 1974 मधील अनुसूची ‘ब’ नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तक्रारीसोबत पाठवावयाच्या दस्तऐवजांची / पुराव्याची प्रत्येक प्रत स्वाक्षरी करून म्हणजेच स्वसाक्षांकित करून अथवा साक्षर व्यक्तीने साक्षांकित करून त्यावर अशिक्षित तक्रारदाराने अंगठ्याचा ठसा उमटवून सादर करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र लोकआयुक्त कडे ऑनलाईन तक्रार:
महाराष्ट्र लोकआयुक्त आणि उप लोकआयुक्त कडे ऑनलाईन तक्रार करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि आपले पूर्ण नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, विषय, ई-मेल, पत्रव्यवहाराचा पता, तक्रार / गाऱ्हाणे / सुचना, Captcha (पडताळणी संकेतांक कोड), आणि संबंधित तक्रारी फाईल अपलोड करून तक्रार दाखल करा.
https://lokayukta.maharashtra.gov.in/Site/Information/Complaints.aspx
महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त अधिनियम, 1971 PDF फाईल:महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त अधिनियम, 1971 PDF फाईल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
संपर्क:
लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य, मुंबई. नवीन प्रशासन भवन, 1ला मजला, मादाम कामा रोड, मंत्रालयासमोर, मुंबई-400 032. फोन नं.: 2202 4540 फॅक्स नं.: 2202 4540, ईमेल: soadm.lokayukta@maharashtra.gov.in
अ.क्र. | नाव | पदनाम | दूरध्वनी क्रमांक (कार्यालय) आणि ई-मेल आयडी |
---|---|---|---|
1 | न्यायमूर्ती वि. मु. कानडे | लोक आयुक्त | 22023822 lokayukta@maharashtra.gov.in |
2 | श्री. संजय भाटिया | उप लोक आयुक्त | 22024503 upalokayukta@maharashtra.gov.in |
3 | रिक्त | उप लोक आयुक्त | 22852931 upalokayukta2@maharashtra.gov.in |
4 | श्री. म. सि. गुप्ता | प्रबंधक | 22024540 |
5 | श्रीमती अ. अ. देशपांडे | अतिरिक्त प्रबंधक | 22852901 |
6 | कुमारी रा. वा. पालवणकर | सहायक प्रबंधक (1) | 22824358 ar1.lokayukta@maharashtra.gov.in |
7 | श्रीमती नि. नि. तरे | सहायक प्रबंधक (2) | 22835600 ar3.lokayukta@maharashtra.gov.in |
8 | श्रीमती सो. सु. जांबेकर | सहायक प्रबंधक (3) | 22824358 ar4.lokayukta@maharashtra.gov.in |
9 | श्री. ल. शां. सावंत | सहायक प्रबंधक (4) | 22835600 ar2.lokayukta@maharashtra.gov.in |
10 | श्रीमती दि. दि. जाधव | सचिव | 22023822 |
11 | श्रीमती आ. ता. पाटील | लोक आयुक्तांचे वरिष्ठ स्वीय सहायक | 22024540 |
12 | श्री. सं. म. पाटील | उप लोक आयुक्तांचे वरिष्ठ स्वीय सहायक | 22024503 |
13 | रिक्त | उप लोक आयुक्तांचे वरिष्ठ स्वीय सहायक | २२८५२९३१ |
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!