जन्मजात बाळाची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या सविस्तर माहिती – Newborn Baby Care Tips
बाळाचा जन्म झाल्यावर सगळ्यांनाच खूप आनंद होतो. पण त्याचबरोबर बाळाच्या आरोग्याकडे लक्ष देणेही खूप गरजेचं आहे. बाळ जन्मल्यानंतर सुरुवातीच्या काही काळात त्याला अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. म्हणूनच त्याची योग्य काळजी महत्त्वाची असते. बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने त्याचे जन्मत: असलेले वजन व जन्माच्या वेळची वाढ हे दोन घटक निर्णायक ठरतात.
जन्मजात बाळाची काळजी कशी घ्यावी? – Newborn Baby Care Tips:
प्राथमिक काळजी:
बाळाचे डोके बाहेर आल्यावर बाळ पूर्ण बाहेर येण्याची वाट न पहाता सर्वप्रथम बाळाचा श्वसनमार्ग साफ करावा.त्यामुळे बाळाला श्वास घ्यायला काही प्रॉब्लेम होत नाही.
बाळाला कोरडे करणे:
बाळाचा जन्म झाल्यावर बाळाचे नाक, तोंड आणि घसा म्यूकस नळीने साफ करावे. म्यूकस नळी नसल्यास स्वच्छ मऊ सुती कपडा करंगळीला गुंडाळून बाळाच्या घशातून बोट फिरवून चिकटा काढून टाकावा. तसेच बाळाला उलटे धरु नये. किंवा बाळावर पाणी मारु नये. बाळ बाहेर येऊन, नाळेतील नाडी तपासून ती थांबल्यावरच नाळ कापावी. व बाळाला नीट कोरडे करून उबदार कपडयात गुंडाळून ठेवावे.
जन्म झाल्यावर बाळ न रडल्यास:
बाळाचा जन्म झाल्यावर व बाळाला पूर्णपणे साफ करून झाल्यावरही जर बाळ रडत नसेल तर अम्बू बॅग व मास्क वापरून कृत्रिम श्वास द्यावा. बॅग व मास्क नसेल तर बाळाच्या नाक व तोंडावर पातळ कपडा घालावा. आपल्या तोंडाने बाळाच्या नाकातोंडात आपले गाल फुगवून हलके फुंकर घालावी. फुंकताना फक्त आपल्या गालातलीच हवा द्यावी. छातीतली नाही.1 मिनिटामध्ये 10 ते 15 वेळा फुंकर द्यावी.
बाळाचे वजन तपासणे
जर बाळाचे वजन 1500 ग्रॅम-2000 ग्रॅम व त्याखालील असेल किंवा 32-36 आठवड्यांनंतर जन्म झाल्यास नवजात शिशूसाठीच्या खास ठिकाणी काळजी घ्यावी लागते व प्रशिक्षित परिचारिका व डॉक्टरांची गरज असते.32 आठवड्यांच्या आधी प्रसूती झाली व बाळाचे वजन 1500 ग्रॅमपेक्षा कमी असेल तर अशा बाळाला जास्त काळापर्यंत इन्सेंटिव्ह निओनेटल केअर युनिटमध्ये इन्क्युबेटरमध्ये ठेवावे लागते. या बाळाची जास्त काळजी घेण्याची गरज असते.
बाळाचा जन्म झाल्यावर पहिल्या 2-3 दिवसांमध्ये बाळाचे वजन कमी होते. नंतरच्या 1-2 दिवसांत वजन कमी राहते; पण स्थिर असते. नंतर वजन वाढायला सुरुवात होते. फक्त स्तनपानावर असलेल्या बाळांचे वजन जास्त कमी होते. कारण योग्य प्रमाणात स्तनपानास सुरुवात जन्मानंतर 2-3 दिवसांनी होते. पहिल्या वर्षापर्यंत बाळाचे वजन दररोज 20 ते 30 ग्रॅमने वाढते. पहिल्या 4-5 महिन्यांत वजन जन्माच्या वजनापेक्षा दुप्पट होते. वजनावर लक्ष ठेवल्यामुळे बाळाला आहार पुरेसा मिळतो आहे की नाही, ते ठरवता येते. वेळोवेळी बाळाचे लसीकरण अत्यावश्यक असते.
बाळाची त्वचा:
जन्मत: बाळाच्या अंगावर व्हर्निक्सचा एक थर असतो. तसेच अंगावरील केस जास्त असतात. काही काळाने हे केस व हा थर आपोआप निघून जातो. स्वच्छ हात धुऊन हलक्या हाताने थोड्या तेलाने बाळाला मालिश केले, तर हा थर पटकन जातो; तसेच पांढरा थर खरडून काढू नये. तेल लावून साफ केल्यावर हळू हळू आपोआप हा थर निघून जाईल. परंतु दररोज अंघोळ घालून व साबणाच्या वापराने हे तेल संपूर्ण काढून टाकणे आवश्यक असते. जर त्वचेवर तेल तसेच राहिले तर जंतुसंसर्ग वाढू शकतो. तसेच त्वचेची छिद्रे बंद होऊन पुरळ इ. येऊ शकते. बाळाला अंघोळ घालण्यापूर्वी व नंतर जंतुनाशकाने हात धुणे अत्यावश्यक असते. शरीराच्या काही वळ्यांमध्ये तसेच शी-शूची जागा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
नाळ:
बाळाचा जन्म झाल्यावर लगेचच नाळ निर्जंतुक दो-याने बांधली जाते. किंवा नाळेला चिमटा लावला जातो. तसेच जंतुनाशक औषधे लावून तो भाग निर्जंतुक करावा लागतो. त्या ठिकाणी लावलेला चिमटा काढता कामा नये. कारण हा काढला तर त्या ठिकाणच्या रक्तवाहिन्यांमधून रक्तस्राव होऊ शकतो. काही दिवसांनी नाळेचा हा भाग सुकून जातो व गळून पडतो. उन्हाळ्याच्या दिवसांत व थंडीच्या दिवसांत हे पटकन होते. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे नाळ लवकर पडून जात नाही.त्यामुळे बाळाच्या नाळेची काळजी घेणे गरजेचे आहे.
डोळे:
बाळाचे डोळे स्वच्छ फडक्याने पुसून घ्या. उपलब्ध असल्यास डोळयात जंतुनाशक थेंब (टेट्रा) टाका.तसेच लहान बाळाच्या डोळ्यातून जास्त चिकट द्राव येतो. बाळाला स्वत:ला तो स्वच्छ करता येत नसल्याने बाळाचे डोळे दर थोड्या वेळाने स्वच्छ कापसाने किंवा मऊ ओल्या रुमालाने पुसावे लागतात.
स्तनपान:
पहिल्यापासूनच बाळाला अंगावर पाजायला सांगा. दूध जरी लगेच आले नाही तरी असे केल्याने पान्हा फुटण्यास मदत होते. पहिला चीक जंतुरोधक असतो. तो वाया जाऊ देऊ नका. ब-याच ठिकाणी पहिले तीन दिवस बाळाला अंगावर न पाजण्याची पध्दत आहे, ती चुकीची आहे.
व्यंग:
बाळाचा जन्म झाल्यावर प्राथमिक तपासणी करून बाळास काही व्यंग नाही याची तपासणी करून घ्या. असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
बाळाला पुरळ येणे:
बळाचा जन्म झाल्यावर वातावरणातील अनेक प्रकारचे जंतू बाळाच्या त्वचेच्या सान्निध्यात येतात व त्यामुळे बाळाला पुरळ/फोड येऊ शकतात. त्वचा लालसर होऊ शकते. त्वचेची योग्य स्वच्छता आणि गरज असल्यास अँटिबायोटिक्स वापरून यावर उपाययोजना करता येते.
बाळाला स्वच्छ व सुती फडक्यात गुंडाळून ठेवणे:
बाळाच्या जन्म झाल्यावर बाळाला स्वच्छ कोरडे करा व स्वच्छ सुती फडक्यात गुंडाळून ठेवा. थंडीचे दिवस असतील तर गरम राहील इतके पांघरूण वापरा. व बाळाच्या आईजवळ ठेवा. जर तापमान आणि आर्द्रता जास्त असेल व बाळाला जास्त गुंडाळून ठेवले तर खूप घाम येऊन बाळाच्या त्वचेला पुरळ/फोड येऊ शकतात.
बाळाला शी आणि लघवी होते कि नाही ते तपासणे:
बाळ जन्मल्यानंतर बाळाला शी होते. बाळाला सुरुवातीला पातळ, चिकट, हिरवट, काळी शी होते. ती लगेच ओल्या फडक्याने साफ करून घ्या. बाळाच्या अंगावर शी वाळली तर ती काढताना नाजुक त्वचेवर जखमा होतात.
हेही वाचा – उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त सूचना – Health Tips
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!