महाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

प्रत्येक गावात दोन कर्तबगार महिलांना मिळणार “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार”

महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती निमित्त दिनांक ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

प्रत्येक गावात दोन कर्तबगार महिलांना मिळणार “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार”:-

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी दिनांक ३१ मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायत / गट ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या दोन कर्तबगार महिलांना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यास या शासन निर्णयाव्दारे मान्यता देण्यात येत आहे.

>

सदर पुरस्कार हा दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी देण्यात यावा. सदर पुरस्काराचे स्वरुप, पात्रता निकष, पुरस्कारार्थी महिलेची निवड करण्याची कार्यपध्दती व यंत्रणा खालीलप्रमाणे राहील:-

पुरस्काराचे स्वरुप :-

१. सन्मानपत्र

२. सन्मानचिन्ह

३. शाल व श्रीफळ (नारळ)

४. रोख रक्कम (रु. ५००/- प्रती महिला)

पात्रता निकष:-

१. महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट उल्लेखनिय कार्य करीत असलेल्या महिला,

२. सदर महिला हया त्याच ग्रामपंचायतीतील / गट ग्रामपंचायतीतील रहिवासी असावी,

३. त्याचे कार्य हे त्याच ग्रामपंचायती / गट ग्रामपंचायतीमध्ये केलेले असावे,

४. महिला व बाल विकास क्षेत्रात किमान ३ वर्ष कार्य केलेले असावे,

५. पुरस्कार प्राप्त महिला या सात वर्षानंतर सदर पुरस्कारासाठी पुन्हा पात्र ठरतील,

६. महिलांच्या समस्या व प्रश्नांबाबत जाणीव व संवेदनशीलता असावी.

७. सामाजिक क्षेत्रात सक्रीय सहभाग असावा,

८. महिला अत्याचारामध्ये समाविष्ट नसावी.

९. बाल विवाह प्रतिबंध, हुंडा निमुर्लन, लिंग चिकीत्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य, साक्षरता, मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार या सारख्या कार्यामध्ये उत्स्फुर्तपणे पुढाकार घेतलेला असावा.

पुरस्कारार्थी महिलेची निवड करण्याची कार्यपध्दती:-

इच्छुक महिलेने स्वतःची वैयक्तिक माहिती व केलेल्या कार्याच्या तपशिलासह संबंधित ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा.

यंत्रणा :-

अ) जिल्हास्तरावर जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी यांनी समन्वयाने जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उपरोक्त उपक्रम योग्य पध्दतीने राबविण्याची दक्षता घ्यावी.

ब) तालुकास्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकारी व संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) यांनी समन्वयाने तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उपरोक्त उपक्रम योग्य पध्दतीने राबविण्याची दक्षता घ्यावी.

क) ग्रामपंचायत स्तरावर दोन कर्तबगार महिलांची निवड करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, पोलिस पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांची समिती गठीत करण्यात यावी. ज्या ग्राम पंचायतीमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी यांचा कार्यकाल समाप्त झालेला असेल / ग्रामपंचायत बरखास्त झालेली असेल, अशा ठिकाणी प्रशासक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात यावी.

सन्मानपत्राचा विहीत नमुना आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शासनाच्या मान्यतेने निश्चित करुन जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीला उपलब्ध करुन द्यावा. त्यापुढील कार्यवाही ग्रामपंचायत स्तरावर करण्यात यावी..

सदर पुरस्कारासाठी प्रती ग्रामपंचायत / गट ग्रामपंचायत अंदाजे रु. २०००/- इतका खर्च अपेक्षित आहे. सदर खर्च “जिल्हा परिषदांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला व बाल कल्याण समितीने राबवावयाच्या योजनांबाबत ग्राम विकास विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय क्र.झेडपीए २०१३/प्र.क्र.७६/पंरा-१, दि. १९.०१.२०२१ अन्वये महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बाल कल्याण समित्यांना उपलब्ध होणाऱ्या जिल्हा परिषद उत्पन्नाच्या १० टक्के निधीमधून करावा.

सदर पुरस्कार या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच दि. ३१ मे २०२३ रोजी प्रदान करण्यात यावा. याबाबतची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी. प्रस्तुत उपक्रमाबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांनी शासनास दि. १५ जून २०२३ पर्यंत सादर करावा.

 शासन निर्णय: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त दिनांक 31 मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्याबाबत  शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.