वणवा लावणाऱ्यांची आणि शिकार करणाऱ्यांची माहिती कळवा अन् बक्षीस मिळवा !
वणवा म्हणजे जंगल, कुरणे, किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग. वणवा एकदा का पेटला की जंगल महिनाभर जळत राहू शकतो. काही समाजकंटकांकडून लावल्या जाणाऱ्या वणव्यांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, हे आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाने एक योजना अमलात आणली आहे.
वणवा लावणाऱ्यांची आणि शिकार करणाऱ्यांची माहिती कळवा अन् बक्षीस मिळवा!
वनसंपदेची लूट करण्यासाठी जंगलांना आग लावली जाते. वन्य प्राण्यांची शिकार केली जाते. वन संपदा आणि वन्यजीव वाचविण्यासाठी अखेर वन विभागाला बक्षीस जाहीर करावे लागले. वणवा लावणाऱ्यांची आणि शिकार करणाऱ्यांची माहिती कळवा अन् बक्षीस मिळवा, अशी योजना वन विभागाने जाहीर केली.
अलीकडील महिन्यांमध्ये जिल्ह्यातील विविध भागांमध्ये वन्यजीवांचा अधिवास असलेल्या ठिकाणी वणवे लागण्याच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे वनसंपदा नष्ट होऊ लागली आहे. तसेच चोरट्या शिकारीच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. वणवा आणि धुराचा त्रास वन्यजीव प्राण्यास, तसेच मानवालाही होऊ लागला आहे. मावळ तालुक्यातील सह्याद्री पर्वतांच्या डोंगररांगा शापित होत आहेत. पर्यायाने डोंगररांगांचे सौंदर्य, त्यामधील विपुल वनसंपदा नष्ट होते. ९९ टक्के वणवे मानवनिर्मित असतात, असे वन विभागाचे म्हणणे आहे. गावरान फळे, फुले, छोटे सरपटणारे प्राणी, पशु, पक्षी व अन्य वन्यजीवांनाही वणव्यांत जीव गमवावा लागतो.
दरवर्षी वनवणव्यांमुळे बहुमोल वनसंपत्ती नष्ट होते आणि जैवविविधतेचा ऱ्हास होतो. या जंगलांमुळे गवत, झाडे, झुडपे यांची नैसर्गिक पुनरुत्पत्ती थांबते. त्यामुळे, वनांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि पर्यायाने उत्पादनक्षमता कमी होते. आपल्यासारख्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणाऱ्या राज्यात ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरते. झाडांच्या जळण्यामुळे हवेचे होणारे प्रदूषण, आगीमध्ये जीवजंतू, कीटक आणि प्राणी यांचे होणारे मृत्यू, शेकडो वर्षे जुनी वनसंपत्ती नष्ट होणे, असे अनेक अनिष्ट परिणाम होतात. याशिवाय, जमीन उघडी पडल्याने पावसाळ्यात तलाव आणि धरणांमध्ये माती जाऊन त्यांची साठवण क्षमता कमी होते. वन्यजीवांचे अधिवास आगीमुळे नष्ट झाल्याने ते वनांबाहेर पडून शेतीचे नुकसान किंवा पाळीव प्राणी आणि मानवांवर हल्ले अशा घटना घडतात. पक्ष्यांची घरटी जळणे, वन्यप्राण्यांचे शावक मृत्यमुखी पडणे असे अनेक प्रकारचे नुकसान जंगलातील वणव्यांमुळे होते.
काही प्राणी या वणव्याच्या आगीत होरपळत आहेत. तसेच काही ठिकाणी डुकरांच्या शिकारीसाठी फटाके टाकून ठेवले जातात, या फटाक्यांच्या स्फोटात अनेकदा
पाळीव प्राण्यांचाही बळी जातो. नागरिकांनी वनात स्वयंपाक करू नये, वनक्षेत्रात बीडी, सिगारेट ओढून त्याची थोटके फेकू नयेत, वनांलगत शेतातील पालापाचोळा, उसाचे पाचट जाळू नये, रात्री वनातून जाताना हातात टेंभा, पलिते, कंदील घेऊन जाऊ नये, त्याऐवजी बॅटरी वापरावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
जंगलात आग लावल्यास भारतीय वन अधिनियम १९२७ चे २६ (१) ब आणि क तसेच क्न्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ नुसार र दंडनीय अपराध आहे. त्यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावास आणि २५ हजार रुपये दंड होऊ शकतो. तसेच वणवा आणि शिकारींबाबत १९२६ या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
हेही वाचा – डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन -वन विकास योजना
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!