वृत्त विशेषसरकारी योजनास्पर्धा परीक्षा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना – Swadhar Yojana Maharashtra

दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात राज्यात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशास मर्यादा येत आहेत. शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह सुरू करून तेथे प्रवेश देण्यावर, जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात.

अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना १० वी/ १२ वी/ पदवी/पदवीका परिक्षेमध्ये ६०% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५०% असेल. (शासन निर्णय क्र. बीसीएच २०१६/ प्र.क्र. २९३ / शिक्षण -२).

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना – Swadhar Yojana Maharashtra:

या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर ( इयत्ता ११ वी, पदवी, पदव्युत्तर पदवी) शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेशित नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी खालीलप्रमाणे रक्कम संबंधीत विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत करण्यात येईल.

खर्चाचा तपशीलमुंबई शहर, नवी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचव, नागपूर या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कममहसूल विभागीय शहर व  ‘क’ वर्ग मनपा शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कमउर्वरित शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम
भोजन भत्ता32000/- रु.28000/- रु.25000/- रु.
निवास भत्ता20000/- रुपये15000/- रुपये12000/- रुपये
निर्वाह भत्ता8000 रु.8000/- रु.6000/- रु.
एकूण वार्षिक अनुदान स्वाधार योजना60000/- रुपये51000/-रुपये43000/- रु.

टिप : – वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकिय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रु.५०००/- व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रु.२०००/- इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.

 • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष, अटी व शर्ती या अर्जासोबत जोडलेल्या आहेत. त्याचे विद्यार्थी व पालकांनी अवलोकन करावे. निकष, अटी व शर्ती पुर्ण करणा-या विद्यार्थ्यांनीच अर्ज भरावेत.
 • अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या यादीसह तो विदयार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र ज्या जिल्हयातुन काढलेले आहे त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामध्ये समक्ष/टपालादवारे/कार्यालयाच्या ई मेल वर दाखल करावा. अधिक माहितीसाठी संबंधीत जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.
 • अपुर्ण भरलेले अर्ज आणि अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज रद्द समजण्यात येतील.
 • ६० % पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्याथ्र्यांसाठी ही मर्यादा ५० % असेल.
 • जिल्हा निहाय अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती विद्यार्थ्यांना हा लाभ द्यावयाचा ही संख्या निश्चित केलेली असुन त्यापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
 • निवडयादी संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत प्रसिध्द केली जाईल. निवड न झालेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रमाणे निकष असतील:

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विदयार्थी संबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडे अर्ज सादर करतील. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे अर्जाची छानणी करतील व त्यांची गुणवत्ता यादी जिल्हानिहाय तयार करुन पात्र लाभार्थ्यांना त्याने घेतलेल्या प्रवेशाचे जिल्हयातील जवळचे मागासवर्गीय मुला/मुलींचे वसतिगृहांशी संलग्न (attach) करतील. सामाजिक न्याय विभागाने ठरवून दिलेल्या पध्दतीने या योजनेसाठी अर्ज करावा लागेल.

विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:

 1. सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसुचित जाती व नवबौध्द या प्रवर्गाचा असावा.
 2. त्याने जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल.
 3. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहीवासी असावा.
 4. विद्यार्थ्यांने स्वत: चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत/शेड्युल्ड बँकेत खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.
 5. विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न रु.२,५०,०००/- (अक्षरी रूपये दोन लाख पन्नास हजार फक्त) पेक्षा जास्त नसावे.
 6. विद्यार्थी स्थानिक नसावा. (विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवासी नसावा)
 7. विद्यार्थी इ. ११ वी, १२ वी आणि त्यानंतरचे दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणारा असावा.
 8. इ. ११ वी आणि १२ वी मध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यास १० वी मध्ये किमान ६०% गुण असणे अनिवार्य असेल.
 9. इ.१२ वी नंतरच्या दोन वर्षाकरीता जास्त कालावधी असलेल्या पदवीका किंवा पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास इ. १२ वी मध्ये ६० टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिर्वाय आहे.
 10. दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसणा-या कोणत्याही मान्यता प्राप्त अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी किमान ६० % गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/ CGPA चे गुण असणे आवश्यक राहील.
 11. इ. १२ वी नंतर पदवीका, पदवी अभ्यास क्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा आणि पदवीनंतर पदव्युत्तर पदवी/पदवीका अभ्यासक्रमाचा कालवधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा.
 12. विद्यार्थ्याने राज्य शासन, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, भारतीय वैद्यकिय शिक्षण परिषद/वैद्यकिय परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, कृषी परिषद, महाराष्ट्र तंत्रशिक्षण परिषद वा तत्सम सक्षम प्राधिकारी यांच्या मार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालया मध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.
 13. विद्यार्थ्याची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल.
 14. निवडलेला विद्यार्थी संबंधीत अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील.
 15. या योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३ % आरक्षण असेल, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारीची मर्यादा ५० % इतकी राहील.
 16. प्रवेशित विद्यार्थ्यास प्रत्येक सत्र परिक्षेचा निकालाची प्रत निकाल लागल्यापासून १५ दिवसांचे आत नेमून दिलेल्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहिल.
 17. सदर योजनेचा लाभ प्रवेशित अभ्यासक्रमांच्या कालावधीपर्यंतच देय राहिल. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना एकुण शैक्षणिक कालावधीत जास्तीत जास्त ७ वर्षापर्यंत घेता येईल.
 18. विद्यार्थ्याने खोटी माहिती व कागदपत्रे देऊन सदर योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करित असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कारवाईस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रकमेची १२ टक्के व्याजासह वसुली केली जाईल.
 19. या योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी किमान ६० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे अन्यथा तो या योजनेस अपात्र होईल.

लाभाचे वितरण :

 1. विद्यार्थ्यांचा प्रवेश ज्या वसतिगृहाशी संलग्न करण्यात आला आहे त्या वसतिगृहाचे गृहप्रमुख/गृहपाल विद्यार्थ्यांने घेतलेल्या प्रवेशाच्या ठिकाणी म्हणजे संबंधीत महाविद्यालयाकडुन उपस्थितीचा अहवाल प्राप्त करुन संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना सादर करतील व संबंधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी सदर योजनेतील पात्र प्रत्येक तिमाही उपस्थितीच्या आधारे अनुज्ञेय रक्कम त्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT Portal मार्फत जमा करतील. विध्यार्थ्यांच्या बँक खात्याशी त्यांचा आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्यात येईल.
 2. DBT Portal सुरु होईपर्यत प्रचलित पध्दतीने सदरचा लाभ विद्यार्थ्यांच्या नांवे RTGS त्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल.
 3. विद्यार्थ्यांने संबधित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सदर योजनेंतर्गत अनुज्ञेय होणाऱ्या रक्कमेपैकी पहिल्या तिमाहीची रक्कम आगाऊ देण्यात येईल.
 4. या योजनेंतर्गत लाभास पात्र असलेल्या विद्यार्थ्यास भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत प्राप्त होत असलेल्या निर्वाह भत्याची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम निर्वाह भत्ता म्हणून अदा करण्यात येईल.
 5. जे विद्यार्थी व्यवसायिक पाठयक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता या योजनेचा लाभ घेत असतील त्यांना या योजनेतील निर्वाह भत्याचा लाभ मिळणार नाही.
 6. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५ % असणे आवश्यक राहील, याबाबत संबंधित संस्थेच्या प्राचार्यांकडून प्रत्येक तिमाही उपस्थितीबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्जाचा नमुना PDF फाईल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्याने करावयाच्या अर्जाचा नमुना PDF फाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना कार्यपद्धती बाबत नवीन शासन निर्णय जारी

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.