या कलाकारांना मिळणार ५,००० रु. अर्थसहाय्य; शासन निर्णय जारी !
देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण राज्यासह देशात लॉकडाऊन लागू होता. तसेच, लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, नाटयगृहे, चित्रपटगृहे यांच्यावर बंदी असल्याने कलाकारांना सुमारे दीड वर्षापर्यंत कला सादरीकरण व त्यातून होणारे उत्पन्न यापासून वंचित राहावे लागले . तसेच सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रमही या काळात स्थगित करण्यात आलेले होते.
या काळात सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील संघटीत व असंघटीत कलाप्रकारातील विविध कलाकार, ज्यांचे उपजीविकेचे साधन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर करणे असे आहे, त्यांची आर्थिक कुचंबणा झाली आहे. इतर राज्यांमध्ये कलाकारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठोक एकरकमी अनुदान देण्यात आलेले आहे. तसेच राज्यातील विविध विभागांमार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाधित झालेल्या जनसामान्यांना आर्थिक सहाय्य करण्यात आलेले आहे, याच धर्तीवर राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील प्रयोगात्मक कलाप्रकारातील कलाकारांना शासनामार्फत आर्थिक मदत प्राप्त व्हावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी, विविध संघटना, संस्था व कलाकार यांनी केली आहे. सदर मागणी विचारात घेऊन अशा कलाकारांना एकरकमी आर्थिक सहाय्य देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
या कलाकारांना मिळणार 5,000 रु. अर्थसहाय्य; शासन निर्णय जारी !
राज्यातील प्रयोगात्मक कलेच्या प्रकारातील कलाकार, कलासमुह यांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अर्थसहाय्य करण्यास तसेच स्थानिक प्रयोगात्मक कलेतील कलाकारांच्या व संस्थांच्या निवडीशी संबंधित प्रशासकीय खर्चास या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे मान्यता देण्यात आली आहे.
1) एकरकमी कोविड दिलासा पॅकेज:
- अनुदान रक्कम ( रुपये ): 28 कोटी.
- लाभार्थी कलाकार / पथके: 56,000 कलाकार (प्रति कलाकार रु. 5,000 / प्रमाणे).
2) समूह लोककलापथकांचे चालक/ निर्माते / यांना एकरकमी कोविड विशेष अनुदान पॅकेज:
- अनुदान रक्कम ( रुपये ): 6.०० कोटी
- लाभार्थी कलाकार / पथके: 847 कलापथके
अ. क्र. | लोककलेचा तपशील | संस्था संख्या | प्रति पथक प्रस्तावित अनुदान रुपये | एकूण अनुदान रक्कम रुपये |
1 | शाहिरी | 100 | 50 हजार | 50 लाख |
2 | खडीगंमत | 60 | 1 लाख | 60 लाख |
3 | संगीत बारी | 200 | 50 हजार | 1 कोटी |
4 | तमाशा फड पूर्णवेळ | 25 | 2 लाख | 50 लाख |
5 | तमाशा फड हंगामी | 80 | 1 लाख | 80 लाख |
6 | दशावतार | 40 | 1 लाख | 40 लाख |
7 | नाटक | 35 | 2 लाख | 70 लाख |
8 | झाडीपट्टी | 40 | 1 लाख | 40 लाख |
9 | विधीनाटय | 216 | 25 हजार | 54 लाख |
10 | सर्कस | 1 | 6 लाख | 6 लाख |
11 | टुरिंग टॉकीज | 50 | 1 लाख | 50 लाख |
एकूण | 847 | 6 कोटी |
3) प्रयोगात्मक कलेशी संबंधित स्थानिक लोक कलावंत व संस्था निवड विषयक प्रशासकीय खर्च:
- अनुदान रक्कम ( रुपये ): 1.०० कोटी
एकरकमी कोविड दिलासा पॅकेज यासाठी निवड पध्दती, कलाकाराने जोडावयाची कागदपत्रे, समितीची रचना व कार्यपध्दती या सोबतच्या परिशिष्ट अ प्रमाणे राहील. लाभार्थ्यांनी करावयाच्या अर्जाचा नमुना परिशिष्ट ब प्रमाणे राहील. जिल्हाधिकारी/संचालकांनी प्रसिध्द करावयाच्या जाहिरातील नमुना परिशिष्ट – क प्रमाणे राहील.
एकरकमी कोविड दिलासा पॅकेज (एकल कलाकार व समुह/ संस्था /फड/निर्माते यांच्या निवडीसंदर्भात जिल्हाधिकारी स्तर व सांस्कृतिक कार्य संचालनालय स्तरावर प्राप्त अर्जाची छाननी करण्याकरीता अनुक्रमे जिल्हाधिकारी आणि संचालक, सांस्कृतिक कार्य हे त्यांच्या स्तरावर छाननी समिती गठीत करतील. सदर योजनेची अंमलबजावणी हा शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून ५० दिवसांच्या आत पूर्ण करण्यात यावी.
1) एकल कलाकाराने अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे/पात्रता निकष व अटी:
एकल कलाकाराच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी यांनी १) जिल्हा निवड समिती व २) छाननी समिती खालीलप्रमाणे गठीत करावी. सदर निवडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वर्तमान पत्र/ इतर प्रसार माध्यमांद्वारे जाहिरात देऊन संबंधित जिल्हयातील लाभार्थ्यांचे अर्ज विहित नमुन्यात मागविण्यात येतील. सदर अर्जांच्या छाननीसाठी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर छाननी समिती गठीत करावी. सदर छाननी समितीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्था यामधील गट – ब दर्जापेक्षा कमी नसतील, अशा आवश्यकतेनुसार अधिकाऱ्यांचा समावेश असेल. प्राप्त कागदपत्रांची छाननी सदर समितीद्वारे करण्यात येईल. छाननी समितीकडून पात्र अर्ज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीसमोर निर्णयार्थ सादर करण्यात येतील.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –
- विहित नमुन्यातील अर्ज.
- महाराष्ट्रात १५ वर्षे वास्तव्याचा रहिवासी दाखला ( स्थानिक स्वराज्य संस्थेचा दाखलाही ग्राहय.
- तहसिलदारांकडून प्राप्त उत्पन्नाचा दाखला.
- कलेच्या क्षेत्रात १५ वर्षे कार्यरत असल्याबाबतचे पुरावे.
- आधार कार्ड व बँक खाते तपशील.
- शिधापत्रिका सत्यप्रत.
- जिल्हा स्तरावरील समितीने पात्र केलेल्या कलाकारांची यादी विहित तपशीलासह संचालक , सांस्कृतिक कार्य संचालनालय , मुंबई यांचेकडे सादर करावी. त्यानंतर संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जिल्हाधिकारी यांच्याकडून शिफारस करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुज्ञेय अर्थसहाय्य वर्ग करतील.
पात्रता निकष व अटी:
- महाराष्ट्र राज्यातील प्रयोगात्मक कलेतील केवळ कलेवर गुजराण असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलाकार.
- महाराष्ट्रात १५ वर्षे वास्तव्य
- कलेच्या क्षेत्रात १५ वर्षे कार्यरत.
- वार्षिक उत्पन्न रुपये ४८,००० / – च्या कमाल मर्यादेत.
- केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्याच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
2) समूह लोककलापथकांचे चालक / मालक / निर्माते यांनी एकरकमी विशेष कोविड अनुदान पॅकेजसाठी सादर करावयाची कागदपत्रे व निवड पध्दती:
समूह लोककलापथकांचे चालक / मालक / निर्माते यांच्या निवडीसाठी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्याकडून खालीलप्रमाणे निवड समिती तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या स्तरावर छाननी समिती गठीत करण्यात येईल. सदर निवडीसाठी संचालनालयाकडून वर्तमानपत्रातून जाहिरात प्रसारित करून पथकांकडून अर्ज मागविण्यात येतील. छाननी समितीमार्फत प्राप्त अर्जाची पडताळणी करून अर्ज संचालक, सांस्कृतिक कार्य यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीसमोर सादर करेल. त्यातून पात्र पथकांची अंतिम निवड, निवड समिती करेल व निवड झालेल्या संस्थांची नांवे शासनाकडे शिफारस करेल. शासनाकडून शासन निर्णय निर्गमित झाल्यावर अंतिम शिफारस करण्यात आलेल्या संस्थांच्या बँक खात्यात संचालनालयामार्फत रक्कम वर्ग करण्यात येईल.
अर्जदाराने जोडावायची कागदपत्रे:
- विहित नमुन्यातील अर्ज.
- कंपनी कायदा किंवा सोसायटी कायदा, विश्वस्त कायद्यांतर्गत किंवा एमएसएमई अंतर्गत पथक नोंदणीचे प्रमाणपत्र.
- कलापथकात काम करणा-या कलावंतांची नावे व पत्ते.
- लोककलापथकांचे चालक / मालक / निर्माते यांचे आधार कार्ड व बँक खाते तपशील.
- केवळ कलेवरच गुजराण असल्याचे तसेच एकरकमी कोविड दिलासा पॅकेजचा लाभ घेणार नसल्याचे व दिलेली माहिती खोटी आढळल्यास शासनाच्या अनुदान योजनेतून कायमस्वरूपी अपात्र करण्यात येईल, हे माहित असल्याचा उल्लेख असलेले प्रतिज्ञापत्र.
- शाहिरी, खडीगंमत, दशावतार, झाडीपट्टी, संगीतबारी, तमाशा, टुरिंग टॉकीज, सर्कस, विधीनाटय पथकांसाठी, पथकाने आर्थिक वर्ष २०१७-१८ पासून किमान तीन वर्षे सातत्याने दरवर्षी सरासरी किमान ५० कार्यक्रमांचे सादरीकरण केले असल्याबाबतचे किमान ५० आयोजकांची पत्रे/हॅण्डबील/ कार्यक्रम पत्रिका/ वर्तमानपत्रातील जाहिरात / बातमी / ग्रामसेवक / सरपंच यांचे कार्यक्रम सादर केल्याचे प्रमाणपत्र.
- संगीतबारीसाठी आर्थिक वर्ष २०१७-१८ पासून किमान तीन वर्षे सातत्याने दरवर्षी सरासरी किमान १०० प्रयोग केल्याचे कलाकेंद्र प्रमुख/आयोजकांची पत्रे / हॅण्डबील / कार्यक्रम पत्रिका / वर्तमानपत्रातील जाहिरात / बातमी / ग्रामसेवक / सरपंच यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
- नाट्यसंस्थांसाठी आर्थिक वर्ष २०१७-१८ पासून किमान तीन वर्षे सातत्याने दरवर्षी सरासरी किमान ३० प्रयोग केल्याची नाटयगृह भाडेपावती, जाहिरात, तिकीट हे पुरावे जोडणे आवश्यक.
पात्रता निकष व अटी:
- कंपनी कायदा/सोसायटी कायदा/ विश्वस्त कायद्यांतर्गत तसेच M. S. M. E अंतर्गत संस्था नोंदणीकृत असावी. मागील ५ वर्षापासून संस्था कार्यरत असावी.
- संस्थांनी आर्थिक वर्षात सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९ -२० या ३ वर्षात वर नमूद केल्याप्रमाणे कार्यक्रमांचे/ प्रयोगाचे सादरीकरण केलेले असावे.
योजना अंमलबजावणीची कालमर्यादा
1. शासन निर्णय पारीत झाल्याच्या दिनांकापासून ५ दिवसात स्थानिक वृत्रपत्र व इतर प्रसार माध्यमातून सोबत परिशिष्ट क येथील विहित नमुन्यात जाहिरात देणे.
2. शासन निर्णय पारीत झाल्यावर जिल्हाधिकारी / संचालक यांनी १० दिवसात छाननी समिती व निवड समित्यांचे गठन करणे.
3. जाहिरात प्रकाशित झाल्यापासून १० दिवसात कलाकारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविणे.
4. अर्ज प्राप्त झाल्यानंतर १० दिवसात छाननी समितीमार्फत छाननी करणे.
5. अर्ज छाननीनंतर १० दिवसाच्या आत निवड समित्यांच्या बैठका घेऊन कलाकारांची निवड करणे.
6. पात्र कलाकारांच्या निवड याद्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे अर्थसहाय्यासाठी ५ दिवसात सादर करणे. तदनंतर सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून ५ दिवसात पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात अनुज्ञेय अर्थसहाय्य वर्ग करणे.
7. पात्र संस्थांच्या यादीची सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून शिफारस शासनास सादर करणे. शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करणे, पात्र संस्थांच्या बँकखात्यात अनुज्ञेय अर्थसहाय्य वर्ग करणे १० दिवस.
अर्ज नमुना:
- एकल कलाकार (वैयक्तिक) अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
- समूह लोककलापथक अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय:
कोरोना पार्श्वभूमीवर कलाकारांना अर्थसहाय्य देणेबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा दि. 03-11-2021 रोजीचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – कलाकार मानधन योजना – Kalakar Mandhan Yojana
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!