आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी शासनाच्या विविध योजना
आदिवासी समाजाचा बहुविध वारसा आणि संस्कृतीचे जतन करत त्यांना सक्षम करणे आणि त्यांचे हित जपण्यासाठी चालना देणे, हे आदिवासी विकास विभागाचे ध्येय आहे. महाराष्ट्रात मूलनिवासी असलेल्या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे.
आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी शासनाच्या विविध योजना:
आदिवासी समाजाचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास व्हावा यासाठी केंद्र शासन व राज्य शासन विविध योजना प्रभावीपणे राबविते.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना:
शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या एकूण 20,000 विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्याबाबत पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरावरील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना निवास भत्ता, आहार भत्ता, निर्वाह भत्ता तसेच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्याकरिता निर्धारीत केलेले अर्थसहाय्य देण्यात येते.
या योजनेसाठी अटी पुढीलप्रमाणे आहेत : विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा तसेच विद्यार्थ्यांने अर्जासोबत जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न रु.2.50 लाख पेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील. हा विद्यार्थी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. विद्यार्थ्यांस आदिवासी विकास विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा. आदिम जमातीच्या व अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ प्राथम्याने मिळेल.
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना:
अनुसूचित क्षेत्रात स्त्रियांच्या आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यासारख्या गंभीर समस्याबाबत कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आली. गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना एक वेळ चौरस आहार देण्यात येतो. तसेच 7 महिने ते 6 वर्ष या वयोगटातील बालकांना पोषक आहाराचे घरपोच वाटप करण्यात येते.
शबरी आदिवासी घरकूल योजना:
आदिवासी समाज हा अतिदुर्गम भागात राहतो. ते कुड्या मातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या घरात राहतात. त्यांना हक्काचे व कायमस्वरूपी पक्के घर मिळावे यासाठी निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले, शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून सर्व सुविधा व सोयीसह पक्के घरकुल देण्याला प्राधान्य दिले आहे. या योजनेत आदिवासी समाजातील दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य मिळावे, यासाठी या योजनेत 5 टक्के आरक्षण दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ठेवण्यात आले आहे. यामध्येही दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रातंर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रातील जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत घराचे 269.00 चौ.फू. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल बांधून देण्याची तरतूद आहे. शबरी आदिवासी घरकुल योजना – लाभार्थी पात्रता, कागदपत्रे आणि अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना सहाय्य:
प्रशासकीय सेवांमध्ये अनुसूचित जमातीच्या तरुणांची टक्केवारी वाढावी यासाठी आदिवासी विकास विभागाने स्वतंत्र योजना आणली आहे. राज्यातील अनुसूचित जमातीच्या तरुणांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळावे, त्यांचा प्रशासनात सहभाग वाढावा, यासाठी सन 2020-21 या वर्षापासून प्रोत्साहनपर आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील अनुसूचित जमातीचे उमेदवारांचे संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी) मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेण्याचे प्रमाण अल्प आहे. पर्यायाने उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांमध्ये अनुसूचित जमातीचे उमेदवारांचे प्रमाण देखील अल्प आहे. त्यामुळे त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी) यांच्यामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय अधिकारी होण्याची संधी मिळावी म्हणून या उमेदवारांना सदर आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या तयारीकरिता सन 2020-21 या वर्षापासून प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवेची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 25 उमेदवारांना 3 महिन्यांसाठी दरमहा रूपये 12000 इतके निर्वाहभत्ता व रूपये 14000 एकवेळ पुस्तके खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 25 उमेदवारांना 2 महिन्यांकरिता दरमहा रूपये 12000 इतका निर्वाहभत्ता देण्यात येतो.
खासगी संस्थेत प्रशिक्षणासाठी सहाय्य:
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेच्या संपूर्ण तयारीकरिता ( पूर्व व मुख्य परीक्षा, मुलाखत ) नामवंत खाजगी व्यावसायिक संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सदर योजनेचा लाभ 100 उमेदवारांना देण्यात येईल. याकरीता प्रशिक्षणाचे शुल्क आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचेकडून संबंधित संस्थेला अदा करण्यात येईल. तसेच, दिल्ली येथे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना दरमहा रूपये 12,000 तर महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षणासाठी दरमहा रूपये 8,000 निवास व भोजनासाठी देण्यात येतील. तर पुस्तके खरेदी करण्यासाठी एकदा रूपये 14,000 प्रशिक्षणार्थीस देण्यात येतील.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी 121 शाळा आदर्श आश्रमशाळा म्हणून विकसित:
आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या एकूण 497 शासकीय आश्रमशाळांपैकी प्रथम टप्यात 121 शाळांना “आदर्श आश्रमशाळा” म्हणून विकसित करण्याच्या निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. आदर्श आश्रमशाळेकरिता सुसज्ज शालेय इमारत त्यामध्ये आयसीटी लॅब, सायन्स लॅब, ग्रंथालय, संगीत व कला कक्ष तसेच पुरेशी शौचालये, निवासी मुले व मुलींकरीता स्वतंत्र व सुसज्ज वसतिगृहाची इमारत, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था, प्रत्येक आदर्श आश्रमशाळेत सुसज्ज भोजनालय व बहुउद्देशीय सभागृह, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पुरेशा सोयी-सुविधांसह स्वतंत्र शौचालय, स्वच्छ व पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण व क्रीडा साहित्य असावे, आदर्श आश्रमशाळेच्या परिसरात सर्व सोयी-सुविधांसह स्वतंत्र सीक रूम, सीसीटीव्ही कॅमेरे यांसारख्या भौतिक सुविधांचा समावेश असणार आहे.
एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल:
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने नवव्या पंचवार्षिक योजनेत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्य स्तरावर निवासी शाळा स्थापन करण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला. या शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE), नवी दिल्ली यांचेशी संलग्न असून या शाळांमध्ये इ. 6 वी ते 12 वी (विज्ञान) पर्यंतचे वर्ग नैसर्गिक वाढीने सुरू करण्यात येतात. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच निवास, अंथरूण-पांघरूण, भोजन, गणवेश, पाठ्यपुस्तके वह्या व शैक्षणिक साहित्य इ. सुविधा मोफत देण्यात येतात. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, व्यवसाय प्रशिक्षण आणि इतर विशेष पाठ्योत्तर कार्यक्रम यांना पुरेसा वेळ मिळेल अशा प्रकारे या शाळांचे वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे. आज पर्यंत राज्यामध्ये एकूण 39 एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल शाळा मंजूर करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 37 एकलव्य निवासी शाळा कार्यान्वित असून त्यामध्ये एकूण 7044 इतके विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
स्वाभिमान सबलीकरण योजना:
दारिद्र्य रेषेखालील आदिवासी भूमिहीन कुटूबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे तसेच त्यांना कसण्यासाठी जमीन उपलब्ध करण्यासाठी आदिवासी विकास विभाग स्वाभिमान सबलीकरण योजना राबविते. या योजनेअंतर्गत चार एकर पर्यंत कोरडवाहू जमीन प्रती एकर पाच लक्ष दराने आणि दोन एकर पर्यंत बागायती जमीन प्रती एकर आठ लक्ष या कमाल दराने देण्याची तरतूद आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने खाजगी जमीन प्रचलित शिघ्रशिध्द (रेडीरेकनर) किंमतीप्रमाणे विकत घेऊन उपलब्ध करून द्यावयाची आहे. या दराने जमीन उपलब्ध होत नसल्यास 20 टक्के च्या पटीत 100 टक्के पर्यंत म्हणजेच रेडीरेकनरच्या दुपटीपर्यंत किंमत वाढविण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीस देण्यात आले आहेत. ही योजना 100 टक्के शासन अनुदानित आहे. यापूर्वीच्या योजनेतील 15 वर्ष वास्तव्याची अट वगळण्यात आली असून लाभार्थी त्या गावचा रहिवासी असावा व भूमिहीन असावा तसेच दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये त्याची नोंद असावी. या योजनेसाठी निवडावयाच्या लाभार्थ्यामध्ये दारिद्रयरेषेखालील भूमिहीन आदिवासी परितक्त्या स्त्रिया , दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन आदिवासी विधवा स्त्रिया, भूमिहीन कुमारी माता, भूमिहीन आदिम जमाती, भूमिहीन पारधी यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना:
राज्यातील आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील आदिवासी उपयोजना क्षेत्र, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्र, माडा व मिनीमाडा, अर्थसंकल्पित माडा व मिनीमाडा क्षेत्र व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील 50 टक्केपेक्षा जास्त आदिवासींची लोकसंख्या असलेल्या वस्त्या, पाडे, वाड्या, गावांच्या व महानगरपालिका, नगरपरिषदेचे प्रभाग येथील विकासासाठी आवश्यक असलेल्या सामुहिक विकासाच्या सुविधा पुरवण्यासाठी ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा एकात्मिक कार्यक्रम ही योजना राबविण्यात येते.
हेही वाचा – “शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांसाठी ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ – (Mission Zero Dropout)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!