45 कोटी जनधन खात्यांमध्ये 2.1 लाख कोटी रुपये जमा
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज फेडरल बँकेच्या 2024 च्या वार्षिक सरकारी आणि संस्थात्मक व्यवसाय संमेलनाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबोधित करताना, मंत्र्यांनी प्रारंभीच फेडरल बँकेच्या सर्वकालीन उच्च समभाग मूल्यांबद्दल अभिनंदन केले.
याआधीच्या काळात सत्तेवर असलेल्या सरकारची आठवण करून देताना ठाकूर म्हणाले की, 2014 पूर्वीचे सरकार ‘धोरण लकवा’ साठी ओळखले जात होते. 2014 पासून, सर्व क्षेत्रांविषयीच्या उद्देशांमध्ये परिवर्तन झाले आहे. ‘रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म’ याकडे लक्ष्य केंद्रीत केले गेले आहे. बँकिंग क्षेत्र आज कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडले आहे आणि सर्वकालीन उच्च कामगिरीचे प्रदर्शन करीत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री जन धन योजना’ जाहीर केली, त्यावेळी सर्वत्र ज्याप्रकरे भावना, कल व्यक्त होत असे, त्याची आठवण करून देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, अनेकांनी ही योजना ‘नॉनस्टार्टर’ म्हणून नाकारली होती. परंतु आज या योजनेंतर्गत 45 कोटी बँक खाती उघडली गेली. याचा अभिमान सरकारला वाटतो. या जन-धन खात्यांमार्फत 2.1 लाख कोटी रुपयांचा जो निधी जमा झाला आहे, तो बँकिंग परिसंस्थेचा भाग आहे.
समाजातील प्रत्येक घटकाविषयी उत्तरदायित्व आणि सरकारचा पारदर्शक कारभार, यांचे मिश्रण साधून सरकार कार्यरत आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे गेल्या दहा वर्षांत 25 कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढता आले. तसेच सरकारी योजनांचा लाभ लोकांना मिळत असल्याचा हा पुरावा असल्याचेही ठाकूर यावेळी म्हणाले. ‘जेएएम’ त्रिवेणीच्या अंमलबजावणीमुळे सामाजिक क्षेत्रातील योजनांवर सरकारकडून जितका खर्च केला जातो, तो शंभर टक्के निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे सरकार अभिमानाने जाहीर करू शकते.
सरकार धाडसी निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेत राहील आणि आगामी 5 वर्षांत भारताला अव्वल 3 अर्थव्यवस्थांपैकी एक आणि 2047 पर्यंत विकसित देश बनवण्याचा निर्धार पूर्ण करेल, अशी ग्वाही मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी दिली.
हेही वाचा – आपल्या पंतप्रधान जन धन बँक खात्याची शिल्लक अशी तपासा !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!