कृषी योजनासरकारी योजना

पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) योजना 2021 मध्ये राबविण्यास मंजुरी

सन २०१८-१९ मध्ये क्रॉपसॅप व हॉर्टसॅप प्रकल्पाची एकसमान कार्यपध्दती विचारात घेऊन दोन स्वतंत्र प्रकल्प न राबवता हॉर्टसॅप प्रकल्पाचा समावेश क्रॉपसॅप योजनेमध्ये करुन एकाच लेखाशिर्षांतर्गत संदर्भिय शासन निर्णय दिनांक १९/०५/२०१८ नुसार एकत्रित अंमलबजावणी करण्यात आली आहे. खरीप २०१८ मध्ये मका, उस व ज्वारी या पिकांवर नव्यानेच लष्करी अळीचा (Fall Army worm) तसेच उस पिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संदर्भ क्र. २ येथील दि.२६/०२/२०१९ च्या शासन निर्णयान्वये मका व ऊस या पिकांचाही क्रॉपसॅप प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्यात टोळ किडीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान होऊ नये म्हणून क्रॉपसॅप योजनेअंतर्गत आपत्कालीन परिस्थितीत कीड नियंत्रणाकरीता मंजूर असलेल्या निधीतून तसेच अन्य बाबीवरील बचतीतून निधी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच दि.२३/०३/२०२१ च्या शासन निर्णयान्वये काजू, भेंडी व टोमॅटो या पिकांचाही क्रॉपसॅप प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे. आयुक्त कार्यालयाने पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावास प्रस्तुत योजना सन २०२१-२२ मध्ये राज्यात राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

पीकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) योजना:

१. सन २०२१-२२ पासून सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा, मका, ज्वारी व ऊस तसेच फळपिके आंबा, डाळींब, केळी, मोसंबी, संत्रा, चिक्कू, काजू, भेंडी व टोमॅटो या प्रमुख पिकांवरील कीड व रोगाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने एकत्रितकीड – रोग सर्वेक्षण व सल्ला योजना (क्रॉपसॅप) योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. सन २०२१-२२ मध्ये या योजनेतंर्गत रु. २५.०० कोटी (अक्षरी रुपये पंचवीस कोटी फक्त) निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

२. सन २०१८-१९ करीता शासनाने संदर्भ क्र. १, २, ४ व ६ येथील शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या सुचनांस अनुसरुन कीड – रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेची सन २०२१-२२ मध्ये अंमलबजावणी करण्याकरिता आयुक्त (कृषि) यांनी सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित करणार.

३. केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (NFSM), राष्ट्रीय कृषि विकास योजना (RKVY) आणि नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (POCRA) या योजनांच्या समन्वयातून एकात्मिक स्वरुपात (Convergence) अंमलबजावणीचा आराखडा तयार करुन शेतीशाळांचे नियोजन करण्यात यावे. सदर प्रयोजनार्थ प्राधान्याने विविध केंद्र पुरस्कृत योजना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (NFSM), राष्ट्रीय कृषि विकास योजना (RKVY) आणि नानाजी देशमुख कृषि संजीवनी (POCRA) प्रकल्पांतर्गत उपलब्ध निधीतून पात्र बाबींसाठी खर्च करण्यास व तद्नंतर निधी कमी पडल्यास आवश्यकतेनुसार सदरच्या राज्य योजनांतर्गत उपलब्ध होणाऱ्या तरतूदीतून खर्च भागविण्यात येणार.

४. सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा मका, ज्वारी व ऊस या पिकांसाठी क्रॉपसॅप योजनेची अंमलबजावणी कृषि विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सहभागाने करण्यात येणार व याकरीता राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांनी विकसीत केलेल्या मोबाईल ऍप्लिकेश व संगणक प्रणालीचा वापर करण्यात येणार. आंबा, डाळींब, केळी, मोसंबी, संत्रा, चिक्कू, काजू, भेंडी व टोमॅटो पिकांसाठी योजनेची अंमलबजावणी कृषि विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सहभागाने करण्यात येईल व त्याकरीता राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन संशोधन केंद्र, नवी दिल्ली यांनी विकसीत केलेल्या संगणक प्रणालीचा वापर करण्यात येईल.

५. क्रॉपसॅप योजनेतंर्गत पिकांवरील प्रमुख कीड व रोगांचे सर्वेक्षण करुन त्यांच्या व्यवस्थापनाबाबत संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार महाॲग्रीटेक प्रकल्पांतर्गत उपलब्ध होणाऱ्या वनस्पती निर्देशांक (Vegitation Condition) व स्वंयचलित हवामान केंद्रांव्दारे (AWS) प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे विद्यापीठातील तज्ज्ञांकडून विश्लेषण करुन देण्यात येणारा सल्ला व मार्गदर्शन मोबाईल ॲपद्वारे/एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार.

६. संबंधित पिकाच्या विकासाच्या विविध महत्वपूर्ण (Critical) टप्प्यावर कीड व रोगाचे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीवर पोहोचण्यापूर्वी अथवा आर्थिक नुकसान पातळीजवळ (पिवळ्या टप्प्यावर असताना) सुरुवातीपासूनच संबंधित नेमून दिलेल्या गावातील पिकांचे नमुने घेऊन त्याची तपासणी व सर्वेक्षण काटेकोरपणे नियमित स्वरुपात प्रणालीद्वारे तज्ञांकडून मार्गदर्शन व सल्ला प्राप्त करुन त्यासंदर्भात तात्काळ संबंधित पीक क्षेत्राच्या गाव व तालुका स्तरावर शेतकऱ्यांना आवश्यक सल्ला मोबाईल एसएमएसद्वारे देण्याची व सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र सभा, बैठका व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्याची जबाबदारी ही कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक यांची राहील. यानुसार गावपातळीवर कार्यवाही नियमितिणे होत असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी ही मंडळ कृषि अधिकारी आणि तालुका कृषि अधिकारी यांची असेल. याबाबतचा उपविभागीय स्तरावर नियमितिणे प्रत्येक पंधरवडयास उपविभागीय कृषि अधिकारी यांनी आढावा घेणे बंधनकारक असेल.

७. वरीलप्रमाणे केलेल्या कार्यवाहीबाबतचा आढावा हा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी व विभागीय कृषि सहसंचालक घेतील. तसेच क्षेत्रीय स्तरावरुन कृषि विद्यापिठांकडे पिकावरील कीड व रोगासंदर्भात मार्गदर्शन व सल्ला घेण्यासाठी प्राप्त होणाऱ्या बाबींची विनाविलंब नोंद घेऊन त्यावर नियमित स्वरुपात दोन दिवसांच्या आत संबंधित तज्ञांचे मार्गदर्शन व सल्ले प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार. याबाबत देखील विद्यापीठ स्तरावर विविध विभागाच्या विभाग प्रमुखांनी आढावा घेणे आवश्यक असेल.

८. तसेच कीड रोगाचे प्रमाण आर्थिक नुकसानपातळीवर (ईटीएल) पोहोचण्यापुर्वी अथवा आर्थिक नुकसानपातळी जवळ (पिवळ्या टप्प्यावर असताना) असलेल्या आणि आर्थिक नुकसानपातळीवर पोहोचलेल्या गावांची तालुकानिहाय स्वतंत्र अद्ययावत यादी सर्व संबंधितांच्या माहितीकरिता खुल्या स्वरुपात प्रकल्पाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणे बंधनकारक असेल.

९. विविध पीकांवरील कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक नुकसान पातळीच्यावरील गावात अन्नसुरक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनाकरीता उपलब्ध असलेली तरतूद योजनेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार शेतकऱ्यांना रासायनिक कीटकनाशक या आपत्कालीन निविष्ठांसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार.

१०. कृषि आयुक्तालयाच्या स्तरावर फळ पिकांच्या सर्वेक्षण व सल्ल्याबाबत संचालक (फलोत्पादन) पर्यवेक्षण व सनियंत्रण करतील. इतर पिकांच्या सर्वेक्षण व सल्ल्याबाबत संचालक (विस्तार व प्रशिक्षण) हे पर्यवेक्षण व सनियंत्रण करतील. संबधित संचालक यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील प्रचलित योजनांची सांगड घालून कीड रोग नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने नियमित पाठपुरावा करावा व सनियंत्रण करावे. तसेच संपुर्ण हंगाम कालावधीत दोन्ही संचालकांनी संबंधित पिकांबाबत क्षेत्रीय स्तरावरील कीड व रोग प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा प्रत्येक आठवडयास आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याची कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल शासनास सादर करावा.

११. शासनाच्या विविध योजनेच्या अंमलबजावणीकरीता निर्माण केलेल्या निरनिराळ्या मोबाईल ऍपद्वारे कीड व रोगांची निरीक्षणे, पीक कापणी प्रयोग, मोका तपासणी इ.करीता स्वत:च्या मोबाईलवरुन ऑनलाईन माहिती भरण्यासाठी तसेच, कीड-रोग व्यवस्थापनाबाबत आणि अन्य बाबींसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मोबाईल इंटरनेट व अन्य आकस्मिक बाबींवर होणाऱ्या खर्चाच्या प्रतीपूर्तीसाठी ज्या कृषि सहायक व कृषि पर्यवेक्षकांना कामे निश्चित करुन देण्यात येते, त्यांना दि.२७.०५.२०२० च्या शासन निर्णयानुसार प्रोत्साहनपर निधी संबंधित केंद्र शासन पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीसाठी असणाऱ्या प्रशासकीय खर्चाच्या तरतूदीतून करण्यात यावा.

१२. प्रकल्पांतर्गत आवश्यक आपत्कालीन निविष्ठांची उपलब्धता दिनांक १ जुलै पासून होणे आवश्यक असल्याने यथाशिघ्र फेरोमेन सापळे व ट्रायकोग्रामा इत्यादी या निविष्ठांच्या वेळेत उत्पादन व पुरवठ्याबाबत महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ, कृषि विद्यापिठे, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभागाच्या जैविक किटकनाशके उत्पादन प्रयोगशाळा यांना आयुक्त (कृषि) यांचे स्तरावरुन कळविण्यात येणार.

१३. सदर योजना शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीत जास्त पीक उत्पादन वाढवून त्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वपुर्ण असल्याने विशेष मोहीम स्वरुपात अंमलबजावणी होईल याची खातरजमा आयुक्त (कृषी) यांनी करावी. याकरीता आवश्यकतेनुरुप योजनेचा प्रचार व प्रसिध्दी देण्याची देखील कार्यवाही करणार.

१४. आयुक्त (कृषि) यांनी सदर योजनेतंर्गत प्राप्त होणाऱ्या निधीचे आवश्यकतेनुसार जिल्हानिहाय वितरण करणार.

१५. सदर योजनेतंर्गत वेळोवळी उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबतचे उयोपगिता प्रमाणपत्र आयुक्त (कृषि) यांनी शासनास सादर करणार.

हेही वाचा – पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (Cropsap) योजना
१६. सन २०२१-२२ मध्ये क्रॉपसॅप योजनेची अमंलबजावणी खर्च पुढील लेखाशीर्षाखाली सन २०२१ २२ करीता मंजूर तरतूदीतून भागविण्यात येणार:

मागणी क्र.डी -३

२४०१, पीक संवर्धन,

१०२ – अन्नधान्यपीके, (00) (३०) पिकावरील कीड – रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (२४०१ ९२४२ राज्य योजना ३३-अर्थसहाय्य

१७. सदर योजनेतंर्गत मंजूर निधी आयुक्तालय स्तरावर कोषागारातून आहरीत करुन योजनेतंर्गत सहभागी संस्थांना वितरीत करण्यास, आणि आयुक्त (कृषि) यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात असुन आयुक्तालय स्तरावरील खर्चासाठी सहाय्यक संचालक, लेखा -१, यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून तसेच, विभागीय कृषि सहसंचालक स्तरावर विभागीय कृषि सहसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी, जिल्हा स्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभाग स्तरावर उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका स्तरावर तालुका कृषि अधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषीत करण्यात येत आहे.

राज्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या (क्रॉपसॅप) अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबतचा नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.