गाव नमुना सात-अ आणि गाव नमुना सात-ब उतारा नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती !
आपण या लेखात गाव नमुना सात-अ आणि गाव नमुना सात-ब उतारा (Gav Namuna Sat A Sat B Utara) नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे आणि सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम ३२ नुसार गाव नमुना ७ अ – या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे आणि सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम ३१ नुसार अधिकार अभिलेखानुसार जमीन कब्ज्यात असल्याचे मानण्यात येणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त इतर व्यक्तींची नोंद गाव नमुना सात-ब मध्ये असते.
गाव नमुना सात-अ आणि गाव नमुना सात-ब उतारा नोंदवही – Gav Namuna Sat A Sat B Utara:
सन १९३२ त १९७३ पर्यत शेतजमिनीत वहिवाट करण्याच्या रीत खालीलप्रमाणे होत्या.
रीत -१:- शेतजमिनीत स्वतः वहिवाट करणे, “याला खुद्द” जमीन कसणे असे म्हणत.
रीत -२:- शेतजमीन स्वतः च्या देखरेखीखाली मजुरांकडून कसून घेणे.
रीत -३:- शेतजमीन खंडाने (रोख) कसावयास देणे व शेत जमीन कसण्याचा मोबदला म्हणून रोख रक्कम देणे.
रीत -४:- शेतजमीन कसल्याचा मोबदला म्हणून पिकातील वाटा खंड म्हणून घेणे. याला “बराईने” जमीन कसणे म्हणत असत.
रीत -५:- शेतजमीन कसल्याचा मोबदला म्हणून पिकातील निश्चित वाटा घेणे याला “अर्धेलीने” जमीन कसणे म्हणत असत.
रीत -६:- शेतजमीन कसल्याचा मोबदला म्हणून रोख रक्कम आणि पीक असा एकत्रित मोबदला घेणे.
ज्या प्रकारच्या रीतने जमीन कसली जात असे त्याचा उल्लेख जुन्या गाव नमुना बारा सदरी “रीत” या स्तंभात केला जात असे. याचा उपयोग कुल हक्क ठरविण्यासाठी होत असे.
कायदेशीर कुळ म्हणजे?
१. जो इसम दुसऱ्यांच्या मालकीची जमीन वैध किंवा कायदेशीररित्या कुळ या नात्याने कसत असेल.
२. जमीन मालक आणि अशा कुळात करार झाला असावा, जर असा करार तोंडी असेल तर तो न्यायालयात सिद्ध होण्यास पात्र असावा.
३. अशा कुळाने जमीन प्रत्यक्ष स्वतः कसली पाहिजे.
४. जमीन कसण्याच्या बदल्यात अशा कुळाने जमीन मालकास नियमितपणे खंड दिला पाहिजे आणि जमीन मालकाने तो खंड स्वीकारला पाहिजे.
५. अशी व्यक्ती जमीन मालकाच्या कुटुंबातील नसावी.
६. अशा व्यक्तीकडे ती जमीन गहाण नसावी.
७. अशी व्यक्ती पगारावर ठेवलेला नोकर नसावी.
८. अशी व्यक्ती जमीन मालकाच्या किंवा जमीन मालकाच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या देखरेखीखाली जमीन कसत नसावी.
सन १९३९ च्या कुळ कायद्यानुसार, दिनांक ,०१/०१/१९३८ पूर्वी सतत ६ वर्षे कुळ म्हणून जमीन कसणाऱ्या व्यक्तीची किंवा दिनांक ०१/०१/१९४५ पूर्वी सतत ६ वर्षे कुळ म्हणून जमीन कसणाऱ्या व्यक्तीची आणि दिनांक ०१/११/१९४७ रोजी कुळ म्हणून जमीन कसणाऱ्या व्यक्तीची नोंद अधिकार अभिलेखात “इतर हक्क” सदरी “संरक्षित कुळ” म्हणून केली जाते.
सन १९५५ साली कुळ कायद्यात सुधारणा करण्यात येण्यापूर्वी ज्या व्यक्तींना वहिवाटीमुळे, रुढीमुळे किंवा न्यायालयीन निकालामुळे कायम कुळ ठरविले गेले त्यांची तसेच जे मुलगेणीदार किंवा मिरासदार म्हणून जमीन धारणा करतात त्यांची नोंद अधिकार अभिलेखात “इतर हक्क” सदरी “कायम कुळ” म्हणून केली जाते.
आजही एक वर्ष जमिनीची वहिवाट करणारा इसम कुळाच्या व्याख्येतील अटींची पूर्तता करत असेल तर तो कुळ असल्याचा दावा करू शकतो.
खालील व्यक्ती शेत जमिनीत वहिवाट करत असतील तरी त्या शेत जमिनीवर जमीन मालकाचा “प्रत्यक्ष ताबा” आहे असे कायदा मानतो.
- अ. जमिनीचा मालक किंवा त्याचे कुटुंबीय
- आ. कुळ कायद्यानुसार असलेले कुळ
- इ. वरील व्यक्तीशिवाय अशी इतर व्यक्ती जी कायदेशीर कागदोपत्री पुराव्यादवारे स्वतःच्या वहिवाटीचे समर्थन करू शकेल.
अनाधिकाराने अथवा दंडेलशाहीने जमिनीचा कब्जा घेणाऱ्या इसमास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम २४२ अन्वये घालवून देता येते.
बेदखल कुळ: महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, २०१२ च्या कलम १४ अन्वये कुळांच्या कसूरीमुळे कुळवहिवाट समाप्त करण्याची तरतूद आहे. कुळांचा कसूर म्हणजे:
अ) कोणत्याही महसूल वर्षाचा खंड वर्षानुवर्षे आणि जाणूनबुजून त्या त्या वर्षाच्या ३१ मे पूर्वी न भरणे.
ब) जमिनीची खराबी अथवा कायम स्वरूपी नुकसान होईल असे कृत्य जाणूनबुजून करणे.
क) जाणूनबुजून महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्या कलम २७ चे उल्लंघन करून जमिनीची पोट विभागणी, पोटपट्टा किंवा अभिहस्तांतरण करणे.
ड) व्यक्तीशः जमीन न कसणे.
इ) जमिनीचा उपयोग शेती किंवा शेतीसंलग्न जोडधंद्यासाठी न करता इतर प्रयोजनांसाठी करणे.
उपरोक्त पद्धतीने कुळांनी कसूर केला असता जमीन मालकाने कुळास तीन महिन्यांची लेखी नोटीस दिली असल्यास कुळवहिवाट समाप्त करण्याची तरतूद आहे. अशा कुळास बेदखल कुळ म्हणतात.
जर कोणतेही कुळ जमीनधारकाच्या जमिनीवर घर बांधून राहत असेल तर जोपर्यत घर बांधण्याचा खर्च जमीन धारकाने केला आहे आणि कुळाने सतत तीन वर्षे खंड दिलेला नाही असे जमीनधारक सिद्ध करत नाही तोपर्यंत कुळाला अशा घरातून काढता येणार नाही. (महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम, २०१२ कलम १६).
कुळाने जमीनधारकाच्या जमिनीवर असे घर बांधलेली जागा जर जमीन मालकास विकायची असेल तर कुळास अशी जागा खरेदी करण्याचा अग्रहक्क असेल. त्यासाठी जमीन मालकाने कुळास सदरची जागा खरेदी करण्याचा कुळाचा इरादा आहे अथवा नाही याबाबत तीन महिने मुदतीची लेखी नोटीस द्यावी. कुळाने होकार कळविल्यास, मूल्य निर्धारणासाठी न्यायाधिकरणाकडे अर्ज करावा. न्यायाधिकरण सदर ठिकाणच्या वार्षिक खंडाच्या वीस पटीहून अधिक नाही अशी किंमत ठरविते व हि रक्कम कुळाने एक वर्षाच्या आत एकत्र किंवा तीन हप्त्यात ४. ५ टक्के व्याज दराने भरून प्रमाणपत्र घ्यावयाचे असते. (महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम, २०१२ कलम १७)
जर कुळाने नकार कळविला किंवा उत्तर दिले नाही किंवा मुदतीत घराची रक्कम भरली नाही तर कुळाचा अग्रहक्क समाप्त होतो.
जर कोणतेही कुळ जमीनधारकाच्या जमिनीवर घर बांधून राहत असेल आणि ती जागा खरेदी करण्याचा कुळाचा मानस असेल तर कुळाने जमीन मालकास तीन महिने मुदतीची लेखी नोटीस द्यावी.
जर जमीन मालकाने याबाबत नकार कळविला किंवा उत्तर दिले नाही किंवा तीन महिन्याच्या मुदतीत कुळाबरोबर विक्री खत केले नाही तर मूल्य निर्धारणासाठी कुळाने न्यायाधिकरणाकडे अर्ज करावा. न्यायाधिकरण सदर ठिकाणच्या वार्षिक खंडाच्या वीस पटीहून अधिक नाही अशी किंमत ठरविते. व हि रक्कम कुळाने एक वर्षाच्या आत एकत्र किंवा तीन हप्त्यात ४.५ टक्के व्याज दराने भरून प्रमाणपत्र घ्यावयाचे आहे. (महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम, २०१२ कलम १७-अ).
गाव नमुना सात -अ:
हा नमुना प्रत्येक कृषी वर्षासाठी स्वतंत्रपणे ठेवण्यात यावा. पीक पाहणीच्या वेळेस तलाठी यांनी यात योग्य त्या नोंदी घ्याव्या. कुळाशिवाय इतर व्यक्ती जमीन कसत आहे असे आढळल्यास तलाठी यांनी तहसिलदाराकडे याबाबत अहवाल सादर करावा.
गाव नमुना सात -अ मध्ये एकूण १० स्तंभ आहेत, ते खालीलप्रमाणे भरावेत.
गाव नमुना सात -अ-स्तंभ १ मध्ये अनुक्रमांक लिहावा.
गाव नमुना सात -अ-स्तंभ-२ मध्ये मागील वर्षाच्या सात -अ नोंदवहीमधील क्रमांक लिहावा.
गाव नमुना सात -अ-स्तंभ-३ मध्ये कुळाचे नाव, मराठी वर्णानुक्रमानुसार लिहावे.
गाव नमुना सात -अ-स्तंभ-४ मध्ये जमीन मालकाचे नाव लिहावे.
गाव नमुना सात -अ-स्तंभ-५ मध्ये शेत जमिनीचा भूमापन क्रमांक आणि हिस्सा क्रमांक लिहावा.
गाव नमुना सात -अ-स्तंभ-६ मध्ये शेत जमिनीचे क्षेत्र हे. -आर मध्ये लिहावे.
गाव नमुना सात -अ-स्तंभ-७ मध्ये शेत जमिनीची आकारणी रु. -पै. मध्ये लिहावी.
गाव नमुना सात -अ-स्तंभ-८ मध्ये कुळ, जमीन मालकास देत असलेला खंड रु. -पै. मध्ये लिहावा.
गाव नमुना सात -अ-स्तंभ-९ मध्ये कुळाची नोंद ज्या फेरफार क्रमांकाने नोंदवली असेल तो फेरफार क्रमांक लिहावा.
गाव नमुना सात -अ-स्तंभ-१० हा शेरा स्तंभ आहे.
गाव नमुना सात-ब:
या नोंदवहीचा मुख्य उद्देश अनधिकृतपणे शेतजमीन कसण्यास/ कब्ज्यात ठेवण्यास प्रतिबंध व्हावा आणि शेतकऱ्याला अशा बेकायदेशीर बाबींपासून संरक्षण मिळावे हा आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे आणि सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम ३१ अन्वये हि नोंदवही ठेवली जाते.
व्यक्तिशः “जमीन कसणे”:
महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम २(६) मध्ये व्यक्तिशः “जमीन कसणे” याचा अर्थ “स्वतःसाठी
(एक) स्वतःच्या मेहनतीने, अथवा
(दोन) स्वतःच्या किंवा स्वतःच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या कष्टाने अथवा
(तीन) स्वतःच्या किंवा स्वतःच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली, मंजुरीने कामावर लावलेल्या मजुरांकडून, त्यांना रोख रक्कम अथवा वस्तूंच्या रूपात वेतन /मोबदला देऊन पिकाच्या हिश्याचा स्वरूपात नव्हे, “जमीन कसून घेणे” असा आहे.
याचाच अर्थ अधिकृत अधिकाराशिवाय कोणालाही कोणाचीही जमीन वहिवाटता येणार नाही.
कायदेशीर तरतूद: महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका – खंड ४ मधील प्रकरण दोन, परिच्छेद ४ आणि ५ मध्ये नमूद केल्याप्रमाणे पीक पाहणीची कामे वर्षात दोन वेळा करायची असतात.
१. खरीप हंगामात ( ०१ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर )
२. रब्बी हंगामात( १५ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी )
महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे आणि सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम ३० (१) नुसार ,पिके जेव्हा शेतात उभी असतील त्या काळात तलाठी यांनी व्यक्तिशः शेतावर जाऊनच पीक पाहणी करणे आवश्यक आहे.
पीक पाहणी करताना तलाठी यांना जर असे निदर्शनास आले कि, एखाद्या शेतजमिनीत, अधिकार अभिलेखानुसार शेतजमीन कब्ज्यात असल्याचे मानण्यात येणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त इतर इसमाचा कब्जा/ वहिवाट, कायदेशीर दस्तऐवजाशिवाय आहे, तर तलाठी यांनी गाव नमुना सात -ब मध्ये या गोष्टीची पेंसिलने त्याची नोंद घ्यावी. यानंतर त्या शेतजमिनींबाबत नमुना १४ चा फॉर्म भरून शक्य असेल तितक्या लवकर (कमाल दहा दिवसांत ) तहसीलदाराकडे पाठवावा.
शेतजमीन मालकाशिवाय दुसऱ्या व्यक्तीचे नाव सात -बारावर पीक पाहणी सदरी थेट लावण्याचे अधिकार तलाठी यांना नाहीत. शेतजमीन मालकाच्या एकत्र कुटुंबातील अन्य सदस्य शेत जमिनीत वहिवाट करीत असतील तर नमुना १४ चा फॉर्म भरू नये. ज्या शेतजमिनीबाबत नमुना १४ चा फॉर्म भरला असेल त्या शेतजमिनीच्या गाव नमुना १२ मध्ये कोणतीही नोंद न घेता, त्याच्या उचित स्तंभात “नमुना १४ भरून पाठवला-निर्णयाधिन” अशी पेन्सिलने नोंद घ्यावी.
तहसीलदार यांनी “नमुना १४ च्या फॉर्ममध्ये नाव असणारी व्यक्ती कायदेशीरपणे शेतजमीन कसत आहे” असा निकाल दिला तर गाव नमुना १२ उचित स्तंभामध्ये आणि गाव नमुना क्रमांक ७ ब मध्ये तहसीलदार यांनी सदर बाबत दिलेल्या निकालाचा क्रमांक व दिनांक शेरा स्तंभात लिहून तशी नोंद करावी.
जर तहसीलदार यांनी “नमुना १४ च्या फॉर्ममध्ये नाव असणारी व्यक्ती अनाधिकाराने शेतजमीन कसत आहे” असा निकाल दिला तर गाव नमुना १२ उचित स्तंभामध्ये शेतजमीन मालकाचे नाव दाखल करावे आणि गाव नमुना सात – ब मधील पेन्सिलची नोंद खोडून टाकावी.
गाव नमुना सात-ब मध्ये एकूण ८ स्तंभ आहेत , ते खालीलप्रमाणे भरावेत.
गाव नमुना सात-ब- स्तंभ १ मध्ये अनुक्रमांक लिहावा.
गाव नमुना सात-ब- स्तंभ २ मध्ये वरील शेत जमिनीचा भूमापन क्रमांक लिहावा.
गाव नमुना सात-ब- स्तंभ ३ मध्ये वरील शेत जमिनीचा हिस्सा क्रमांक लिहावा.
गाव नमुना सात-ब- स्तंभ ४ मध्ये खातेदाराचा गाव नमुना आठ- अ अन्वये दिलेला खाते क्रमांक लिहावा.
गाव नमुना सात-ब- स्तंभ ५ मध्ये हंगाम आणि वर्ष लिहावे.
गाव नमुना सात-ब- स्तंभ ६ मध्ये अधिकार अभिलेखामध्ये नाव नोंदलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त जमीन कब्ज्यात असलेल्या इतर व्यक्तीचे नाव लिहावे.
गाव नमुना सात-ब- स्तंभ ७ मध्ये ज्या दिनांकापासून सदर जमीन उपरोक्त इतर व्यक्तीच्या कब्ज्यात आहे तो दिनांक लिहावा.
गाव नमुना सात-ब- स्तंभ ८ हा शेरा स्तंभ आहे. तहसीलदार यांनी “नमुना १४ च्या फॉर्ममध्ये नाव असणारी व्यक्ती जमीन कसत होती ” असा निकाल दिला तर तहसिलदार यांनी दिलेल्या निकालाचा क्रमांक व दिनांकाची या स्तंभात नोंद करावी.
हेही वाचा – तलाठी कार्यालयातील – गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!