वृत्त विशेष

मुंबईतील ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द, निर्णय तात्काळ अंमलात आणण्याच्या प्रशासनाला सूचना

मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नगरविकास विभागाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. मुंबईत 16 लाखापेक्षा जास्त घरे 500 चौ फुटापेक्षा कमी असून त्यात राहणाऱ्या लाखो कुटुंबांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे.

या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, उपमहापौर सुहास वाडकर, मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, प्रधान सचिव नगरविकास महेश पाठक आदी उपस्थित होते.

राज्यातील सर्वांनाच नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सुविधा देतांना आपल्याला मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे. मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकासकामांमध्ये मोलाचे योगदान देतो. कष्टकऱ्यांच्या घामातून ही मुंबई उभारली आहे हे आम्ही विसरता काम नये.

>

500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ताकर माफ करणे हे महत्त्वाचे वचन पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो असेही मुख्यमंत्री म्हणाले. पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे दिवसरात्र पालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांच्यासमवेत जाऊन मुंबईतील विकासकामांची पाहणी करतात असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईकरांच्या 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून 16 लाख कुटुंबांना लाभ होणार आहे. अशा स्वरूपाचा मोठा निर्णय देशात कुठल्याही पालिकेने घेतला नसेल. मुंबईकरांसाठी महत्वाकांक्षी आणि क्रांतीकारी निर्णय असून नवीन वर्षाची मोठी भेट आहे असे सांगून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मनात मुंबईकरांसाठी तळमळ असून रुग्णालयात असूनही कोविड रोखण्यासाठीचे काम आणि इतर कामांच्या प्रगतीविषयी मुख्यमंत्री वेळोवेळी आढावा घेतात. कोविड काळात देखील विकास कामांना कात्री लावली नाही असेही ते म्हणाले.

मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्र्यांचे आणि नगरविकास मंत्री तसेच पालिका आयुक्त, नगरविकास अधिकारी या सर्वांचे मनापासून आभार मानतो. हा निश्चितच एक क्रांतिकारी निर्णय असून लाखो मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील या महत्त्वाच्या निर्णयासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले.

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.