मोटार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप्सची विक्री करत असलेल्या आघाडीच्या 5 ई-कॉमर्स कंपन्यांना केंद्र सरकारकडून आदेश जारी
ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे होत असलेले उल्लंघन लक्षात घेऊन, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए)मोटार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप्सची विक्री करणाऱ्या, आघाडीच्या पाच ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात केंद्र सरकारने आदेश जारी केले आहेत. सीट बेल्ट न लावल्यामुळे होणाऱ्या अलार्मचा आवाज थांबवून या क्लिप्स एकप्रकारे ग्राहकांचे आयुष्य आणि सुरक्षितता धोक्यात आणत असतात .
मुख्य आयुक्त निधी खरे यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ऍमेझॉन,फ्लिपकार्ट, स्नॅपडील,शॉपक्लूज ,आणि मिशो या पाच ई – कॉमर्स कंपन्यांविरुद्ध, ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याचे आणि अनुचित पद्धतीने व्यापार केल्याचे आदेश पारित केले.आहेत
कार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप्सची विक्री होत असल्याची बाब रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पाठवलेल्या पत्राच्या माध्यमातून, ग्राहक व्यवहार विभागाअंतर्गत असलेल्या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणा निदर्शनाला आली. या पत्रात कार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप्सच्या आक्षेपार्ह विक्रीच्या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे आणि अनुचित विक्री करणारे विक्रेते/ऑनलाइन मंचावर कारवाई करण्याची तसेच यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्याची विनंती या पत्रात करण्यात आली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 138 नुसार मोटारीमधून प्रवास करताना सीट बेल्ट लावणे अनिवार्य आहे. मात्र सीट बेल्ट न लावल्यामुळे वाजणाऱ्या अलार्मचा आवाज थांबवून प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या अशा वस्तूंची ऑनलाइन विक्री ,ग्राहकांच्या जीवनासाठी आणि सुरक्षिततेसाठी असुरक्षित आणि धोकादायक असू शकते.
S.No. | Name of E-commerce Company | Delistings (Numbers as per the submissions made by companies) |
Amazon | 8095 | |
Flipkart | 4000-5000 | |
Meesho | 21 | |
Snapdeal | 1 | |
Shoplcues | 1 | |
Total | 13,118 |
मोटार विमा संरक्षणाच्या बाबतीत दाव्याची रक्कम मागणाऱ्या ग्राहकांसाठी, मोटर सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप वापरणे देखील अडथळा ठरू शकते, कारण यामध्ये विमा कंपनी अशा क्लिप्स वापरणाऱ्या दावेदाराच्या निष्काळजीपणाचे कारण देऊन दावा नाकारू शकते. तर दुसरीकडे, प्रवाशांनी लावलेले सीट बेल्ट प्रतिरोधक म्हणून कार्य करतात आणि वाहनाची धडक झाली तर अशा परिस्थितीत संरक्षक कवच म्हणूनही काम करतात,तसेच अपघात झाला तेव्हा सीट बेल्ट लावला असेल तर एअरबॅग खुली झाल्यामुळे आतील प्रवाशांचा मोठ्या तडाख्यापासून बचाव होतो त्यामुळे प्रवाशांना जोराचा धक्का बसत नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रोत्साहन आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे (सीसीपीए) सोपवण्यात आली आहे. म्हणूनच ,सीसीपीएने कार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिपच्या विक्रीच्या समस्येची दखल घेतली आणि त्यांना असे आढळून आले की अनेक ई-कॉमर्स मंचावर या क्लिप अगदी सहज-सोप्या पद्धतीने विकल्या जात आहेत , परिणामी ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे थेट उल्लंघन होत असून ग्राहकांच्या मौल्यवान जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. काही विक्रेते बॉटल ओपनर किंवा सिगारेट लायटर आदींच्या आडून क्लिपची विक्री करत असल्याचे देखील कारवाईदरम्यान आढळून आले.
ग्राहकांची सुरक्षा आणि त्यांच्या मौल्यवान आयुष्यावर होणाऱ्या परिणामाची तीव्रता लक्षात घेऊन, सीसीपीएने हे प्रकरण सीसीपीएच्या तपास विभागाच्या महासंचालकांकडे पाठवले. तपास अहवालातील शिफारशी आणि ई-कॉमर्स संस्थांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर, सीसीपीएने ई-कॉमर्स मंचांना निर्देश जारी केले. यामध्ये प्रवासी आणि जनतेच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या सर्व कार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप्स आणि संबंधित मोटार वाहन घटकांना यादीतून कायमस्वरूपी हटवण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच त्यांना अशा उत्पादनांच्या दोषी विक्रेत्यांविरुद्ध उचललेल्या पावलांबाबत सीसीपीएला माहिती देण्याचे आणि वरील निर्देशांवरील अनुपालन अहवालासह विक्रेत्यांचे तपशील सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.
सीसीपीएने जारी केलेल्या निर्देशांची दखल घेऊन, सर्व पाच ई-कॉमर्स संस्थांनी अनुपालन अहवाल सादर केला. सीसीपीएने केलेल्या कारवाईच्या आधारे सुमारे 13,118 कार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप्स ई-कॉमर्स मंचावरून हटवण्यात आल्या आहेत. हटवण्यात आलेल्या क्लिप्सचे तपशील पुढीलप्रमाणे :
सध्याच्या प्रकरणांमध्ये करण्यात आलेली कारवाई महत्त्वाची आहे कारण रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या ताज्या अहवालानुसार 2021 मध्ये सीट बेल्ट न घातल्यामुळे 16,000 हून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला, त्यापैकी 8,438 चालक होते आणि उर्वरित 7,959 प्रवासी होते, तसेच अंदाजे 39,231 लोक जखमी झाले, त्यापैकी 16,416 चालक आणि 22,818 प्रवासी होते. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की रस्ते अपघातातील एक तृतीयांशपेक्षा जास्त बळी हे 18-45 वयोगटातील आहेत.
एकूणच मोठ्या प्रमाणावर होणारी जीवित हानी टाळण्यासाठी, कार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर्सचे उत्पादन किंवा विक्री रोखण्यासाठी सीसीपीएने संबंधितांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे ज्यात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि डीपीआयआयटीचे सचिव, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव , ई-कॉमर्स संस्था, उद्योग संघटना आणि स्वयंसेवी ग्राहक संस्था यांचा समावेश आहे.
हेही वाचा – लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढा फक्त आधार कार्डने, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!