आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

पासपोर्ट कसा काढतात? अर्ज कसा करावा? आवश्यक कागदपत्रे काय आहेत? जाणून घ्या सविस्तर माहिती – Apply For Passport

आपण या लेखात पासपोर्ट कसा काढतात? अर्ज कसा करावा? आवश्यक कागदपत्रे काय आहेत? याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. परदेशवारी करायची झाल्यास पासपोर्ट हा अत्यंत गरजेचा दस्तावेज. तो नसल्यास व्हिसाही मिळत नाही. बरेचजण पासपोर्ट काढण्याबाबत निरुत्साही दिसून येतात; पण कधीतरी आयत्यावेळी परदेशात जायची संधी येते आणि केवळ पासपोर्ट नसल्यामुळे ती हुकते. अशावेळी होणारे दुःख हे भावनांपलीकडचे असते. तुमच्यासोबत असा प्रकार घडू नये असे वाटत असेल, तर आजच पासपोर्टसाठी अर्ज करा.

पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा?

१) सर्वप्रथम पासपोर्ट सेवेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

२) तेथे दिलेल्या रकान्यातील माहिती भरून नोंदणी करा.

३) पुढे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. तेथे अर्जदाराचे नाव, मोबाइल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख आणि जवळच्या पासपोर्ट कार्यालयाची माहिती द्यावी लागेल.

४) माहिती संग्राह्य केल्यानंतर नवीन पासपोर्ट/ नूतनीकरण असे दोन पर्याय दिसतील. आपल्या गरजेचा पर्याय निवडावा.

५) त्यापुढील पर्यायावर दिलेली माहिती भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे.

६) पैसे भरण्याच्या पर्यायावर क्लिक करण्याआधी संपूर्ण अर्ज पुन्हा वाचा.

७) ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी विचारणा होईल, तेथे आपल्या सोयीची तारीख आणि वेळ निवडावी.

८) फॉर्मची पावती प्रिंट करून घ्यावी. पासपोर्ट कार्यालयात जाताना ती आवश्यक असते.

पासपोर्ट काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. निवासी पत्ता – आधार कार्ड, पाणी बिल, टेलिफोन बिल (लँडलाईन किंवा पोस्टपेड मोबाइल बिल), वीज बिल, बँक अकाऊंट पासबुक, आयकर प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, गॅस कनेक्शन कार्ड, घरभाडे करार, लहान मुलांच्या पासपोर्टसाठी पालकांचा पासपोर्ट (पहिले आणि शेवटचे पान).
  2. जन्म पुरावा – जन्मदाखला, शाळा सोडल्याचा किंवा शाळा बदली केल्याचा दाखला, जन्म दिनांक नमूद केलेले जीवन विमा निगम प्राधिकरणाचे कागदपत्र, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्व्हिस रेकॉर्डची कॉपी, आधारकार्ड/ई – आधार, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, अनाथ असल्यास अनाथालयाकडून जन्म दिनांक नमूद केलेले प्रमाणपत्र.

पासपोर्ट कार्यालयात जाऊन काय करावे लागते?

१) अपॉइंटमेंटच्या दिवशी ठरलेल्या वेळेत पासपोर्ट कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे. मोबाइलवर आलेला मेसेज वा फॉर्मची पावती दाखविल्यानंतर आत प्रवेश दिला जातो.

२) तेथे प्राथमिक कागदपत्रे तपासून टोकन नंबर जारी केला जातो. आपला टोकन नंबर ज्या खिडकीवर येईल, तेथे सर्व कागदपत्रे (ओरिजिनल आणि झेरॉक्स) सादर करावी लागतील.

३) कागदपत्रांची सखोल पडताळणी केल्यानंतर संगणकीकृत छायाचित्र घेतले जाते. तेच आपल्या पासपोर्टवर छापले जाते. त्यांनतर अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जातो.

४) ते पुनर्पडताळणी करून सही करतात. त्यानंतर अर्ज पोलीस व्हेरिफिकेशनसाठी पाठविला जातो.

पासपोर्टचा अर्ज जमा केल्यानंतर साधारण १५ दिवसांपर्यंत तो आपल्या स्थानिक पोलीस ठाण्यात पाठवतात. पोलीस फोन करून घरी चौकशीला येतात. आठ ते दहा दिवसांत अर्ज पोलिसांच्या शिफारशीने पासपोर्ट कार्यालयात परत जातो. पोलिसांनी प्रमाणपत्र दिल्यानंतर पासपोर्ट पोस्टाने घरी येतो.

पासपोर्ट काढण्यासाठी किती पैसे लागतात?

प्रकार  वय  पाने  किंमत 
नवीन / नूतनीकरण १५ वर्षावर ३६ १५००
नवीन / नूतनीकरण १५ वर्षावर ६० २५००
तत्काळ १५ वर्षावर ३६ ३५००
तत्काळ १५ वर्षावर ६० ४०००
नवीन / नूतनीकरण १५ वर्षांखालील _ १०००
तत्काळ १५ वर्षांखालील _ ३०००

मुंबई महानगर प्रदेशातील सेवा केंद्रे:

अंधेरी, लोअर परळ, मालाड, सांताक्रूझ (पोस्ट ऑफिस), सायन (पोस्ट ऑफिस), विक्रोळी (पोस्ट ऑफिस), ठाणे, भिवंडी (पोस्ट ऑफिस), डोंबिवली (पोस्ट ऑफिस), वाशी (पोस्ट ऑफिस). पासपोर्ट कार्यालयांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत संकेतस्थळ: https://www.passportindia.gov.in

हेही वाचा – पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र (चारित्र्य दाखला) ऑनलाईन काढण्याची प्रोसेस पहा ! (Police Clearance Certificate)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.