सरकारी योजना

राज्यभरात “स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना” सुरू

जल जीवन मिशन अंतर्गत शाश्वत कार्यात्मक नळ जोडणी देण्यासाठी पाण्याचा ताण असलेल्या कालावधीत कॅच द रेन (Catch the Rain) तत्वावर पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याकरिता राज्यभरात “स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना राबविण्याबाबतचा नवीन शासन निर्णय दिनांक २० मे २०२१ रोजी जारी करण्यात आला.

स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना:

सध्या राज्यात केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने जल जीवन मिशन कार्यक्रम सन २०२०-२०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत “हर घर नल से जल” या उद्देशाने ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना वैयक्तिक कार्यात्मक नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. या कार्यक्रमाच्या उद्देशानुसार राज्यातील ग्रामीण भागात नळ पाणी पुरवठा योजनेची कामे हाती घेण्यात आली आहेत अथवा प्रस्तावित आहेत. तथापि, राज्यातील अनेक गावे/वाड्या, दुर्गम डोंगराळ भाग, आदिवासी क्षेत्र हे उन्हाळ्यात पाण्याचा ताण असलेल्या क्षेत्रात असल्यामुळे या गावांमध्ये कार्यात्मक कुटुंब नळ जोडणी द्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी पर्यायी उपाय योजनांची आवश्यकता आहे. राज्यामध्ये सन २००२ ते २००९ या कालावधीत शिवकालीन पाणी साठवण योजना राबविण्यात आली आहे. या योजनेंतर्गत उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या असलेल्या गावांमध्ये पावसाचे पाणी साठवणूक करण्याच्या व स्रोत बळकटीकरणाच्या योजना हाती घेण्यात आल्या होत्या. या योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांद्वारे अनेक गावांच्या उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या यशस्वीपणे सोडविण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर केंद्र शासनाद्वारे इतर राज्यात देखील स्रोत बळकटीकरणाच्या योजना हाती घेण्यास प्रोत्साहन दिले आहे. राज्याची विशिष्ट भौगोलिक व भुस्तरीय रचना तसेच पर्जन्यमानात असलेली मोठी तफावत या बाबींमुळे राज्याचे सुमारे ४२.५ टक्के क्षेत्र (१७३ तालुके) हे अवर्षण प्रवण क्षेत्र आहे. राज्याची भुस्तरीय रचना (Geology), भौगोलिक परिस्थिती व भुपृष्ठीय पाण्याचे स्रोत यामुळे ग्रामीण भागातील सुमारे ८०% पेक्षा अधिक योजना दरवर्षी पुनर्भरीत होणाऱ्या भुजलावर आधारीत आहेत. भुस्तरीय रचनेमुळे अनेक भागात भूजल उपलब्धता देखील हंगामी असते (पावसाळा व हिवाळा). त्यामुळे राज्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा ताण (Water Stress) निर्माण होतो व त्यामुळे अनेक गावे वाड्या-वस्त्यांना अशा कालावधीत व लीन कालावधीत (Lean Period) पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेची समस्या दिसून येते. अशा गावांना पुरक उपाय योजनांद्वारे तात्पुरता पाणी पुरवठा करण्यात येतो. तथापि, यामुळे शाश्वत पाणी पुरवठ्याचा उद्देश साध्य होत नाही किंवा पाण्याचा ताण असलेल्या भागातील ग्रामीण जनतेस नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. राज्यामध्ये पडणाऱ्या एकूण पावसाच्या पाण्यापैकी सुमारे ७०% पाणी हे वाहून जाणारे पाणी (Surface Run- off) व बाष्पीभवन या माध्यमातून निघून जाते. या वाहून जाणाऱ्या पाण्याची उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा ताण असलेल्या गावांची समस्या सोडविण्याकरिता “कॅच द रेन (Catch The Rain)” या तत्वावर वापर करण्याची आवश्यकता आहे.

उन्हाळ्यात सुमारे ३ महिने आणि विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या असणाऱ्या अशा गावे/वाड्या/ वस्त्यांना पिण्याचे पाणी साठवणूक करुन वापरण्यासाठी साठवण टाकी सारख्या उपाय योजना राबविण्याकरिता धोरण निश्चित करण्यासाठी संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार, राज्यात यापुर्वी राबविण्यात आलेल्या शिवकालीन पाणी साठवण योजना तसेच जलस्वराज्य -२ कार्यक्रमांतर्गत पाण्याचा ताण असलेल्या गावे/वाड्या- वस्त्यांकरिता उन्हाळ्यात पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध पद्धतीच्या साठवण टाक्यांच्या योजनांप्रमाणे उपाययोजना हाती घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. समितीच्या अहवालास अनुसरुन, जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत उन्हाळ्यात पाण्याचा ताण जाणवणाऱ्या गावांना तसेच हंगामी भूजल उपलब्धता असलेल्या छोट्या गावे, वाड्या-वस्त्यांना उन्हाळ्यात शाश्वतरित्या पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी पाऊस पाणी संकलनासाठी साठवण टाक्यांच्या योजना तसेच स्रोत बळकटीकरणाच्या योजना हाती घेऊन शिवकालीन पाणी साठवण योजना सुधारीत स्वरुपात पुनर्जिवित करण्याचे प्रस्तावित आहे. यापैकी स्रोत बळकटीकरणासाठी हाती घ्यावयाच्या उपाय योजनांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सुचना प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. उन्हाळ्यात पाण्याचा ताण जाणवणाऱ्या गावे, वाड्यांकरिता पाऊस पाणी संकलनासाठी साठवण टाक्यांच्या उपाययोजना राबविण्याकरिता मान्यता देण्याची व अंमलबजावणीकरिता मार्गदर्शक सुचना प्रसिद्ध करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनेच्या मार्गदर्शक सुचना:

या उन्हाळ्यातील ३ ते ४ महिने आणि अन्य कारणांमुळे काही विशिष्ट कालावधीत पाण्याचा ताण (Water Stress) जाणवणाऱ्या राज्यातील गावे/ वाड्या-वस्त्या यांच्याकरिता पाण्याची साठवणूक करुन ताण (Stress Period) असलेल्या कालावधीत पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत उपाययोजना राबविण्याकरिता “स्व.मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना” या नावाने सर्वसमावेशक योजना राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सुचना पुढीलप्रमाणे आहेत:

• स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनेंतर्गत प्रस्तावित योजना ह्या प्रामुख्याने प्रत्यक्ष पाण्याचा ताण असलेल्या कालावधी करिता आहेत.

• या उपाययोजना मुळ योजनेस पुरक योजना म्हणून घेण्यात याव्यात.

• योजनांकरीता स्रोत म्हणुन पावसाचे पाणी, झरे, पाझर इत्यादी घेणे आवश्यक राहील. पुर्णपणे भूजल आधारीत योजना घेण्यात येऊ नयेत.

• सरासरी किंवा त्यापेक्षा कमी पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रात भूजल आधारीत योजना करणे आवश्यक असल्यास, ओढा किंवा नदी काठच्या सार्वजनिक विहिरीतून पावसाळ्यादरम्यान वा लगतच्या कालावधीतून पाझरणाऱ्या पाण्यातून साठवण टाकी भरली जाईल अशी व्यवस्था करण्यात यावी. साठवून ठेवलेले पाणी पिण्यास वापरण्याकरीता ग्रामस्थांची जनजागृती व क्षमता बांधणी मोठ्या प्रमाणात व सातत्याने करावी.

• या योजना प्रामुख्याने अतिदुर्गम क्षेत्रातील, डोंगराळ भागातील, अदिवासी क्षेत्रातील तसेच DPAP व पाण्याचा ताण असलेल्या क्षेत्रातील गावांकरिता घेण्यात याव्यात.

स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनेंतर्गत हाती घ्यावयाच्या उपाययोजना:

१) मेटॅलीक पद्धतीच्या साठवण टाक्या.

२) फेरोसिमेंट अथवा आर.सी.सी. सिमेंटच्या साठवण टाक्या.

३) जलकुंभ/साठवण टाक्या.

४) पावसाचे पाणी/झरा आधारीत साठवण तलाव (पाणी तळे).

५) फेरोसिमेंटच्या छोट्या टाक्या (पागोळी विहिर).

६) बंद असलेली भुमीगत साठवण टाकी.

वरिल अ.क्र.१ ते ४ येथे दर्शविण्यात आलेल्या उपाययोजना ह्या साधारणत: किमान ५० ते कमाल ५०० पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावे वाड्या/वस्त्यांकरिता घेण्यात याव्यात. ५० पेक्षा कमी लोकसंख्या असलेली गावे/वाड्या/वस्त्यांमध्ये शक्यतो अ.क्र. ५ व ६ येथे नमूद केलेल्या उपाययोजना हाती घ्याव्यात. हाती घ्यावयाच्या उपाययोजनांमधील पाण्याच्या टाकीची क्षमता ही संबंधीत गाव/वाडी/वस्तीच्या लोकसंख्येवर आधारित असावी. पावसाळ्यामध्ये सहजपणे उपलब्ध होणारे शुद्ध व स्वच्छ पाणी, उन्हाळ्यापर्यंत सामुदायिक साठवण टाकीत/जलकुंभात साठवूण ठेऊन, दैनंदीन वितरणाच्या टाकीद्वारे अथवा थेट अस्तित्वातील वितरण व्यवस्थेस जोडून, निर्जतुक करुन, पाण्याचा ताण असलेल्या कालावधीमध्ये, लोकसहभागातून उपलब्ध करुन देण्यात यावे. या प्रकारच्या योजना हाती घेण्यासाठी योजनांचे सविस्तर विवरण स्वतंत्र परिशिष्ट (परिशिष्ट १,२,३ व ४) मध्ये देण्यात आले आहेत.

पाण्याचा ताण असलेल्या गावाच्या गरजेनुसार साठवण तलाव करण्याची आवश्यकता असल्यास योग्य त्या आकारमानाचा साठवण तलाव घेऊन पावसाचे पाणी किंवा झरा या स्रोतातून त्यात पाणी साठवून ठेवण्यात यावे. अशा तलावांमध्ये फुडग्रेड प्रतीच्या पॉलीइथीलीन पेपरचे आच्छादन टाकण्यात यावे. या बाबतच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सुचना देण्यात येतील.

स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनेंतर्गत गाव निवडीचे निकष:

१) तहसीलदार यांनी प्रमाणित केलेली टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणारी गावे/वाड्या/वस्त्या.

२) भौगोलिक दृष्टीने डोंगराळ/दुर्गम/अतिदुर्गम भागातील असे जिल्हा परिषदेतील भूवैज्ञानिक आणि गट विकास अधिकारी यांनी संयुक्तपणे प्रमाणित केलेली गावे किंवा वाड्या वस्त्या.

३) आदिवासी उप-योजना (TSP) तालुक्यातील गावे.

४) याव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी संयुक्तपणे प्रमाणित केलेली विशिष्ट गावे, वाड्या/ वस्त्या, तांडे.

योजनेसाठी जागेची उपलब्धता:

योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील. जागेची उपलब्धता निश्चित झाल्यानंतरच योजनेची अंमलबजावणी हाती घेण्यात यावी.

योजनेची तांत्रिक मान्यता:

स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण कार्यक्रमांतर्गत हाती घ्यावयाच्या उपाययोजनांकरीता शासन निर्णयातील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याकडून तांत्रिक मान्यता देण्यात येईल.

योजनेची प्रशासकीय मान्यता:

स्व.मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण कार्यक्रमांतर्गत हाती घ्यावयाच्या उपाययोजनांकरीता पुढील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात येईल.

योजनेची प्रशासकीय मान्यता

(१) या उपाययोजना हाती घेण्यासाठी निधीच्या उपलब्धतेनुसार संबंधित यंत्रणेने प्रशासकीय मान्यतेबाबत कार्यवाही करावी. निधी उपलब्धतेबाबतची सविस्तर कार्यवाही स्वतंत्रपणे “निधीची उपलब्धता” या घटकाखाली दर्शविली आहे.

(२) ग्रामपंचायत स्तरावर प्रशासकीय मान्यता द्यावयाच्या योजनांच्या बाबतीत प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्राम विकास अधिकारी (ग्रामसेवक) व सरपंच यांच्या संयुक्त स्वाक्षरीने निर्गमित करण्यात यावेत. जिल्हा परिषद स्तरावर प्रशासकीय मान्यता दिलेल्या योजनांच्या बाबतीत प्रशासकीय मान्यतेचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करावेत.

(३) या कार्यक्रमांतर्गत हाती घ्यावयाच्या उपाययोजना अन्य कोणत्याही कार्यक्रमामध्ये समाविष्ट असणार नाहीत, याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासकीय यंत्रणेची असेल.

(४) या प्रकारच्या उपाययोजना ह्या मूळ योजनेला स्वतंत्र पुरक योजना (Stand Alone Scheme) म्हणून करण्यात येत असल्याने या पुरक भागाकरिता दरडोई निकष विचारात घेण्याची आवश्यकता नाही. तसेच या पुरक भागाचे वेगळे अंदाजपत्रक तयार करण्यात यावे व तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता वर नमूद केलेल्या अधिकारानुसार देण्यात यावी.

(५) या कार्यक्रमांतर्गत नमूद उपाययोजनांना सक्षम प्राधिकाऱ्याची तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्यानंतरच प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करताना उपाययोजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल, अंदाजपत्रक व तांत्रिक मान्यतेच्या आदेशाची प्रत सादर करणे अनिवार्य राहील.

योजनांची अंमलबजावणी:

स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण कार्यक्रमांतर्गत हाती घ्यावयाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार शासन निर्णयातील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे संबंधित सक्षम प्राधिकरणाला राहतील.

या उपक्रमान्वये प्रस्तावित योजनांची अंमलबजावणी जल जीवन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार वरील सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल.

१. या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पात्र गावे/वाड्या/वस्त्या, तांडे इत्यादींची संपूर्ण गट निहाय (Block – wise) यादी तयार करावी. त्यास ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची मान्यता घेण्यात यावी. तदनंतर निवड केलेल्या गावांची यादी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील तसेच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा समितीमध्ये मंजूर करुन घेण्यात यावी. या गावांचा समावेश वार्षिक कृती आराखड्यामध्ये करण्यात यावा. या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे फारच गरजेचे असल्यास, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा समितीच्या मान्यतेने उपाययोजना हाती घेण्यात याव्यात. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील समितीची तसेच पुढील मान्यता ह्या कार्योत्तर घेण्यात याव्यात.

२. योजनांच्या पाण्यासाठीचा स्रोत म्हणून पावसाचे पाणी, झरे, पाझर इत्यादींना प्राधान्य देण्यात यावे. सरासरी किंवा त्यापेक्षा कमी पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रात भूजल आधारीत योजना करणे आवश्यक असल्यास, ओढा किंवा नदी काठच्या सार्वजनिक विहिरीतून पावसाळ्यादरम्यान वा लगतच्या कालावधीतून साठवण टाकी भरली जाईल अशी व्यवस्था करण्यात यावी.

३. भूजल आधारीत स्रोत असलेल्या योजनेतील स्रोतांची, योजना हाती घेण्यापुर्वी तसेच अंमलबजावणीनंतर, नियमित पाणी गुणवत्ता तपासण्यात यावी. सर्व योजनांमध्ये निर्जतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. जल जीवन कार्यक्रमाचा उद्देश हर घर नल से जल असा असल्यामुळे घरगुती नळ जोडण्या देणे अपेक्षित आहे. त्याकरिता साठवण टाक्या/जलकुंभातील पाण्याच्या वितरणासाठी या योजना अस्तित्वातील वितरण व्यवस्थेस जोडण्यात याव्यात अथवा दैनंदीन वितरणाच्या टाकीस वितरण व्यवस्थेस जोडण्यात याव्या व त्याद्वारे उन्हाळ्यात पाणी वितरीत करण्यात यावे. आवश्यकता असल्यास अतिरिक्त वितरण व्यवस्था या योजनेत समाविष्ट करण्यात यावी. या योजनांद्वारे साठवणूक केलेल्या पाण्यास मर्यादा आहेत, त्यामुळे वितरण व्यवस्थेत कुठेही पाण्याची गळती होणार नाही याची काळजी घेणेत यावी. गावातील सर्व नळ जोडण्यांना तोट्या असल्याची खात्री करण्यात यावी. या गावे/ वाड्यांमध्ये आवश्यकतेनुसार पाणी सोडणे व बंद करणे इत्यादीसाठीची नियमित यंत्रणा निर्माण करण्यात यावी आणि ग्रामस्थांना पाण्याचा ताळेबंद, साठवणूक केलेले पाणी काटकसरीने वापरणे, पाणी वाया जाऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी या बाबत जनजागृती करण्यात यावी.

६. मेटॅलिक टैंक पध्दतीच्या योजनांकरिताचे टाईप इस्टीमेट परिशिष्ट ५ मध्ये देण्यात आले आहे. योजनांचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील DSR चा वापर करण्यात यावा.

७. प्रशासकीय मान्यतेनंतर योजनांची अंमलबजावणी जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सुचनांनुसार करण्यात यावी. योजना अंमलबजावणीचा कालावधी ४ ते ६ महिन्यांपर्यंत स्थानिक परिस्थितीनुसार देण्यात यावा.

८. या उपक्रमानुसार हाती घ्यावयाच्या उपाय योजना या किमान २० लि. प्रति दिवस प्रति माणसी या क्षमतेच्या बांधण्यात याव्यात. मात्र या गावांमध्ये अस्तित्वातील योजना, भूजल बळकटीकरणाच्या योजना, स्त्रोत बळकटीकरणाच्या योजना पाण्याचे व्यवस्थापन इत्यादी उपाय योजना करुन ५५ लि. प्रति दिवस प्रति माणसी हा निकष साध्य होईल याची खबरदारी घ्यावी.

९ . योजनेमध्ये पंप बसविण्याची आवश्यकता असल्यास प्राधान्याने सौर उर्जेवर आधारीत पंपाचा समावेश करण्यात यावा.

पाणी गुणवत्ता तपासणी:

झरा अथवा भूजल स्रोत असल्यास स्रोत निवडण्यापुर्वी व त्यानंतर त्यांची नियमित पाणी गुणवत्ता तपासण्यात यावी. साठणूक केलेल्या पाण्याची नियमित तसेच उन्हाळ्यात पाणी वितरीत करण्यापुर्वी पाणी गुणवत्ता तपासणी करण्यात यावी. प्रचलित पद्धतीप्रमाणे पाणी गुणवत्ता तपासणीसाठी पाण्याचे नमुने उपविभागीय प्रयोगशाळेत जलसुरक्षाकामार्फत पोहचविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील. उपविभागीय प्रयोगशाळांनी नियमित पद्धतीने तपासणी करुन पाणी गुणवत्ता अहवाल ग्रामपंचायतीस निशुल्क उपलब्ध करुन द्यावा.

योजनांची देखभाल दुरुस्ती:

स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या योजना व्यवस्थित सुरु ठेवणे, साठवण टाकी नियमित भरणे, उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध पद्धतीने वापर करणे व योजनांची देखभाल दुरुस्ती करणे इत्यादीची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची राहील. योजनेकरिता देखभाल दुरुस्तीचा खर्च कमी अपेक्षित असला तरीही, प्रचलित दरानुसार योजनेच्या देखभाल दुरुस्तीकरीता पाणी पट्टी वसुलीची तरतूद करण्यात यावी. योजनेच्या देखभाल दुरुस्ती करीता स्थानिक पातळीवर पाणी व स्वच्छता समिती किंवा जलसुरक्षक यांची क्षमता बांधणी करण्यात यावी.

राबविण्यात आलेल्या योजना व्यवस्थित सुरु आहेत किंवा नाही, साठवण टाकी नियमित भरणे, उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध पद्धतीने वापर व योजनांची देखभाल दुरुस्ती याबाबत तालुका स्तरावरुन नियमित आढावा घेण्यात यावा. त्याकरिता संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी आणि उपविभागीय कार्यालयाचे उपअभियंता यांची या बाबींची नियमीत देखरेख करण्याची, आढावा घेण्याची व ग्रामपंचायतींना आवश्यक ते मार्गदर्शन करण्याची जबाबदारी राहील.

क्षमता बांधणी व जनजागृती:

स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण कार्यक्रमांतर्गत उपाय योजना हाती घेण्यापुर्वी गावातील पाण्याचा ताळेबंद, स्रोत बळकटीकरण, भुजलावर पडणारा ताण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, साठवणूक केलेल्या पाण्याचा वापर व त्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध पद्धतीने वापर इत्यादीबाबत जनजागृती करण्यात यावी.

या उपक्रमांतर्गत हाती घेण्यात आलेल्या व योजनांची अंमलबजावणी करण्यात आलेल्या गावांमध्ये योजनेची देखभाल दुरुस्ती, योजना व्यवस्थित सुरु ठेवणे, साठवण टाकी नियमित भरणे, उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध पद्धतीने वापर, वितरित करण्यात येणाऱ्या पाण्याचे निर्जंतुकीकरण याकरिता ग्रामस्थांची, पाणी व स्वच्छता समिती सदस्यांची तसेच संबंधित जलसुरक्षक अथवा पाणी पुरवठा कर्मचारी यांची सातत्याने जन जागृती व क्षमता बांधणी करण्याची आवश्यकता आहे. याकरिता उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) यांनी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाद्वारे कार्यवाही करावी. या उपाययोजनांची देखभाल तसेच स्थानिक स्तरावर दुरुस्ती याकरीता संबधीत गावातील किमान २ ते ३ व्यक्तींना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेची राहील.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधी:

स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनेंतर्गत प्रस्तावित योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावरुन जिल्हा परिषद यांना जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीतुन या योजनांच्या अंमलबजावणीचा खर्च करण्यात यावा.

जल जीवन मिशन कार्यक्रमाव्यतिरिक्त जिल्हा नियोजन समितीकडे असलेला निधी, वित्त आयोग, Corporate Social Responsibility (CSR) अंतर्गत उपलब्ध निधी अथवा इतर निधी उपलब्ध असल्यास त्याचा देखील या योजना राबविण्याकरिता वापर करण्यात यावा.

मेटॅलीक पद्धतीच्या साठवण टाक्या:

या योजनेमध्ये झिंक अल्युमिनिअम पासून बनलेली मेटॅलीक पद्धतीची मुख्य साठवण टाकी उभारण्यात यावी. टाकीच्या आतील बाजूस फुडग्रेड लायनर लावण्यात यावे. पाण्याचा ताण असलेल्या गावाचा ताण असलेला कालावधी निश्चित करुन गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मुख्य साठवण टाकीची क्षमता निश्चित करण्यात यावी. टाकीमध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार पाऊस, झरा इत्यादी स्रोतांचा वापर करण्यात यावा. सर्व मेटॅलीक साठवण टाक्यांना, टाकीच्या छतावर पडणाऱ्या पावसाचे पाणी टाकीत साठविण्याचे प्रयोजन असावे. मुख्य साठवण टाकीपासून दैनंदिन वितरणासाठी पाईपलाईनद्वारे छोट्या प्लास्टीकच्या टाकीमध्ये पाणी सोडून तेथुन ते स्टैंड पोस्ट अथवा घरगुती नळ जोडणीद्वारे वितरीत करावे. साठवूण ठेवलेले पाणी वितरण करतेवेळी निर्जतुकीकरण करुन देण्यासाठी क्लोरीनेशनची व्यवस्था करण्यात यावी.

योजनेचे डिझाईन:

अ) आवश्यकतेनुसार मुख्य स्रोतातुन गुरुत्व वाहिनी अथवा पंपिंग करुन पाणी मुख्य साठवण टाकी पर्यंत आणणे.

ब) मुख्य साठवण टाकी, ज्याची क्षमता ताण असलेल्या कालावधी नुसार निश्चित केली असेल त्या टाकीमध्ये पावसाचे किंवा झऱ्याचे पाणी (अथवा भूजल मुबलक उपलब्ध असेल (पावसाळ्यात व हिवाळ्यात) त्यावेळी) पाणी साठवून ठेवणे, क) उन्हाळ्यात भूजल उपलब्ध नसल्यामुळे मुख्य साठवण टाकीत साठविलेले पाणी दैनंदिन वापराच्या टाकीतून गावातील जलसुरक्षक/बचत गट/लोकसहभागाच्या मदतीने प्रस्तावित निकषाप्रमाणे किमान २० लिटर प्रती दिवस प्रतीदिन उपलब्ध करुन देणे.

योजनेचे फायदे

योजनेच्या अंमलबजावणीसाठी अत्यंत कमी कालावधी लागतो.

• रस्ता नसलेल्या दुर्गम भागातील देखील योजनेची अंमलबजावणी केली जाऊ शकते.

• देखभाल दुरुस्तीचा खर्च अत्यंत कमी आहे.

• पाण्याची गुणवत्ता टिकून रहाते.

• आवश्यकता पडल्यास योजना इतरत्र हलविता येते.

फेरो सिमेंट किंवा आर.सी.सी. साठवण टाक्या

या योजनेमध्ये फेरो सिमेंट किंवा आर.सी.सी. पासून बनलेली सिमेंटची मुख्य साठवण टाकी उभारण्यात यावी. पाण्याचा ताण असलेल्या गावाचा ताण असलेला कालावधी निश्चित करुन गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मुख्य साठवण टाकीची क्षमता निश्चित करण्यात यावी. टाकीमध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार पाऊस, झरा इत्यादी स्रोतांचा वापर करण्यात यावा. सर्व सिमेंटच्या साठवण टाक्यांना, टाकीच्या छतावर पडणाऱ्या पावसाचे पाणी टाकीत साठविण्याचे प्रयोजन असावे. मुख्य साठवण टाकीपासुन दैनंदिन वितरणासाठी पाईपलाईनद्वारे छोट्या प्लास्टिकच्या टाकीमध्ये पाणी सोडून तेथून ते स्टैंड पोस्ट अथवा घरगुती नळ जोडणीद्वारे वितरीत करावे. साठवुन ठेवलेले पाणी वितरण करतेवेळी निर्जतुकीकरण करुन देण्यासाठी क्लोरीनेशनची व्यवस्था करण्यात यावी.

योजनेचे डिझाईन:

अ) आवश्यकतेनुसार मुख्य स्रोतातून गुरुत्व वाहिनी अथवा पंपिंग करुन पाणी मुख्य साठवण टाकी पर्यंत आणणे.

ब) मुख्य साठवण टाकी ज्याची क्षमता टंचाई कालावधी नुसार निश्चित केली असेल त्या टाकीमध्ये पावसाचे किंवा झऱ्याचे पाणी (अथवा भूजल मुबलक उपलब्ध असेल (पावसाळ्यात व हिवाळ्यात) त्यावेळी) पाणी साठवुन ठेवणे.

क) उन्हाळ्यात भूजल उपलब्ध नसल्यामुळे मुख्य साठवण टाकीत साठविलेले पाणी दैनंदिन वापराच्या टाकीतून गावातील जलसुरक्षक/बचत गट/लोकसहभागाच्या मदतीने प्रस्तावित निकषाप्रमाणे किमान २० लिटर प्रती दिवस प्रती दिन उपलब्ध करुन देणे.

योजनेचे फायदे

१) दुर्गम डोंगराळ भागात योजनेची अंमलबजावणी केली जाऊ शकते.

२) देखभाल दुरुस्तीचा खर्च कमी आहे.

३) पाण्याची गुणवत्ता टिकून राहते.

४) कमी खर्चाची उपाय योजना.

जलकुंभ/कठीण खडकातील टाकी योजनेद्वारे पाणी पुरवठा योजना

उन्हाळ्यात पाणी कमी पडणाऱ्या व पाण्याचा ताण जाणवणाऱ्या गावांकरिता अशा प्रकारची योजना राबविली जाऊ शकते. या योजनेमध्ये गावातील अस्तित्वातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीचे खोलीकरण व रुंदीकरण (१० ते २० मीटर) करुन आवश्यकतेनुसार जलकुंभ तयार केला जातो. विहिरीची खोली व रुंदी वाढविल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साठा उपलब्ध होतो. खोली वाढवताना कठीण खडकापर्यंत जाऊन त्यामध्ये किमान १ ते २ मीटर खुदाई करणे आवश्यक आहे. विहिरीचा वरचा भाग बांधुन घेणे आवश्यक असते. या जलकुंभातुन पंपिंगद्वारे घरगुती नळ जोडणीद्वारे वितरण व्यवस्था निर्माण केली जाऊ शकते. बाष्पीभवनामुळे व्यय होणाऱ्या पाण्याचा विचार करुन अतिरिक्त साठवणूक क्षमतेचा विचार करण्यात यावा. उन्हाळ्यात लगतच्या भागातील भूजल पातळी खालावल्यास जलकुंभातील भूजल कमी होऊन पुन्हा टंचाई जाणवू शकते, त्या करिता कठीण पाषाणात किमान २ मीटर पर्यंत खोली वाढविण्यात यावी. योजनेचे पाणी दूषित होऊ नये या करिता काळजी घेण्यात यावी. योजना प्रस्तावित करताना स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात.

योजनेचे फायदे.

१) डोंगराळ भागात तसेच राज्यातील इतर भागात योजनेची अंमलबजावणी केली जाऊ शकते.

२) घरगुती नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा केला जाऊ शकतो.

३) कमी पर्जन्यमानाचे क्षेत्र असलेल्या भागात देखील अंमलबजावणी शक्य.

साठवण तलाव/ तळे:

पाण्याचा ताण असलेल्या गावे/वाड्यांमध्ये व्यवहार्य असल्यास साठवण तलाव/तळे या योजना घेता येऊ शकतील. ताण असलेल्या कालावधीकरिता पाणी पुरवठा करण्यासाठी पावसाळ्यामध्ये पाणी साठवण तलावामध्ये साठवूण ठेवता येऊ शकेल. साठवण तलावासाठी मुबलक जागेची आवश्यकता लागणार आहे. साठवण तलावाचे आकारमान व आराखडा (design) गावाची लोकसंख्या, पाण्याचा ताण असलेला कालावधी, पाणी वितरणाचा दर, पर्जन्यमान, बाष्पीभवनाचा दर, भुस्तरीय रचना, टोपोग्राफी इत्यादीबाबींचे विश्लेषण करुन त्यानुसार निश्चित करण्यात यावे. तलावामध्ये साठवूण ठेवण्यासाठी पावसाच्या पाणी तसेच उपलब्ध असल्यास झरा अथवा नजिकच्या स्रोतातून पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या भुजलाचा वापर करण्यात यावा. साठवण तलाव भरण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी. जमिनीवरुन वाहून जाणारे पाणी या साठवण तलावात सोडण्यात येऊ नये. जमिनीवरुन वाहुन जाणाऱ्या पाण्यामुळे साठवूण ठेवलेले पिण्याचे पाणी दूषित होऊ शकेल.

साठवण तलाव खुदाईसाठी नियोजन विभागामार्फत व राज्य फलोत्पादन मिशन द्वारे निर्गमित शेततळी बांधण्याबाबतच्या मार्गदर्शक सुचनांचा वापर करण्यात यावा. साठवूण ठेवलेले पाणी पाझरु नये याकरिता साठवण तलावाच्या तळाशी व तटबंदीपर्यंत उत्तम प्रतीच्या पॉलीइथीलीन मटेरीयलचे आच्छादन टाकण्यात यावे. अशा प्रकारचे आच्छादन चांगल्या प्रतीचे असावे अन्यथा त्याची साठवलेल्या पाण्यासोबत प्रक्रिया होऊन त्याच्यामुळे देखील पिण्याचे पाणी दूषित होऊ शकेल.

साठवण तलावातून मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होऊन साठवलेले पाणी कमी होत असते. बाष्पीभवन कमी करण्यासाठी उपलब्ध पद्धतींचा वापर करता येऊ शकेल. परंतु त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खराब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. साठवण तलावातून वितरण व्यवस्थेद्वारे पाण्याचा ताण असलेल्या कालावधीत पिण्याचे व घरगुती वापराचे पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे. त्या करिता अस्तित्वातील योजनेची उपांगे यांचा विचार करुन आवश्यकतेनुसार पाईपलाईन, वितरण टाकी, वितरण व्यवस्था इत्यादींचा समावेश योजनेत करण्यात यावा. पाणी वितरण करतेवेळी शुद्ध व निर्जंतुक करुन वितरण करण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात यावी.

जल जीवन मिशन अंतर्गत शाश्वत कार्यात्मक नळ जोडणी देण्यासाठी पाण्याचा ताण असलेल्या कालावधीत कॅच द रेन (Catch the Rain) तत्वावर पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याकरिता राज्यभरात “स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना राबविण्याबाबतचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.