रेशन आपल्या दारी – फिरते शिधावाटप दुकान “ शिधारथ” मार्फत अन्नधान्य वितरण !
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ मधील लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये सुधारणा अंतर्गत कलम १२ (१) मध्ये केंद्र व राज्य शासनांनी या अधिनियमात त्यांच्यासाठी उद्देशित असलेल्या भूमिकेशी अनुरूप लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये अधिकाधिक आवश्यक सुधारणा हाती घेण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.
शिधावाटप दुकाने ही सार्वजनिक वितरण व्यवस्था व लाभार्थी यांना जोडणारा दुवा असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा चेहरा आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात जागेच्या अभावी, शिधावाटप दुकानाच्या जागेचे परवडत नसणारे भाडे, शिधावाटप दुकान चालविण्यासाठी कमी प्रमाणात मिळणारा प्रतिसाद या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण करण्यात येत असलेल्या अडचणींमुळे फिरते शिधावाटप दुकान “शिधारथ” मार्फत अन्नधान्य वितरण करण्याकरिता रेशन आपल्या दारी ही योजना सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
मुंबई- ठाणे शिधावाटप क्षेत्रात फिरते शिधावाटप दुकान “ शिधारथ” मार्फत अन्नधान्य वितरण शासन निर्णय :
राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या धर्तीवर “रेशन आपल्या दारी” ही योजना सुरु करण्यास तसेच सदर योजनेंतर्गत मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना फिरते शिधावाटप दुकान “शिधारथ” मार्फत धान्य वितरण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
योजनेचे टप्पे :
सदरची योजना मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात खालील तीन टप्प्यात राबविण्यात येईल-
१) प्रथम टप्पा : रद्द / निलंबित /जोडलेल्या स्थितीत (एन पार्ट) असणाऱ्या शिधावाटप दुकानांचा फिरते शिधावाटप दुकानामार्फत धान्य वितरण करण्याकरिता समावेश करण्यात यावा. ज्या ठिकाणी शिधापत्रिकाधारकांची संख्या कमी आहे, अशा ठिकाणी दुकानांच्या शिधापत्रिका एकत्रिकरणाचा पर्याय निवडावा.
२) द्वितीय टप्पा : इतर शिधावाटप दुकानदार यांची शिधावाटप दुकानाऐवजी फिरते शिधावाटप दुकानामार्फत धान्य वाटप करण्यास इच्छुकता असल्यास त्यांचा समावेश करण्यात यावा.
३) तृतीय टप्पा : फिरत्या शिधावाटप दुकानाकरिता कोणीही इच्छुकता न दर्शविल्यास अशा विभागांत जाहिरनाम्याद्वारे नविन शिधावाटप दुकान मंजुरीची प्रक्रिया राबविण्यात यावी.
फिरते शिधावाटप दुकानाकरिता मंजूरी प्राधिकारी :
१) महाराष्ट्र अन्नधान्य शिधावाटप (द्वितीय) आदेश, १९६६ च्या नियम ३ अन्वये मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात शिधावाटप दुकानाचे प्राधिकारपत्र मंजुरीचे अधिकार नियंत्रक शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांना देण्यात आले आहेत.
२) सदर आदेशाच्या नियम २ (क) अन्वये नियंत्रक शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई या संज्ञेत उपनियंत्रक शिधावाटप, सहायक नियंत्रक शिधावाटप यांचा समावेश करण्यात आला आहे.
उपनियंत्रक शिधावाटप कार्यालय, महानगरपालिका, पोलीस (वाहतूक) या विभागाचे संबंधित अधिकारी यांनी ठिकाण निवडीबाबत खालीलप्रमाणे संयुक्त कार्यवाही करणे आवश्यक राहील :
१) उपनियंत्रक शिधावाटप कार्यालय, महानगरपालिका वॉर्ड, पोलीस (वाहतूक) या विभागांच्या संबंधित क्षेत्रातील अधिकारी यांनी संयुक्तिकरित्या ठिकाणांचे निरीक्षण करून फिरते शिधावाटप दुकान उभे करण्यासाठीची ठिकाणे ठरवावीत.
२) फिरते शिधावाटप दुकान उभे करण्याची ठिकाणे लाभार्थ्यांच्या सोयीची व जवळची असावी.
३) मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रातील मुसळधार पावसाची तीव्रता लक्षात घेता निवडण्यात येणाऱ्या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.
फिरते शिधावाटप दुकान – स्थळ पाहणी अहवाल :
१) संयुक्त पाहणी केल्यानंतर सदरचे ठिकाण फिरत्या शिधावाटप दुकानासाठी उपनियंत्रक शिधावाटप यांच्याकडे प्रस्तावित करण्यासाठी शिधावाटप अधिकारी यांनी सदर ठिकाणाचा संयुक्त स्थळ पाहणी अहवाल तयार करावा.
२) उपनियंत्रक शिधावाटप यांनी तपासणी अंती योग्य आढळून येणाऱ्या जागांचा अहवाल नियंत्रक शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्या मान्यतेस्तव सादर करावा.
३) मूळ शिधावाटप दुकानाचे फिरते शिधावाटप दुकान म्हणून नियंत्रक शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी फिरत्या शिधावाटप दुकानास अंतिम मान्यता द्यावी.
४) “फिरते शिधावाटप दुकान संयुक्त स्थळ पाहणी अहवाल” नमुना या शासन निर्णयासोबत – जोडलेल्या परिशिष्ट-अ मध्ये देण्यात आला आहे.
उपनियंत्रक शिधावाटप व फिरते शिधावाटप दुकानदार यांच्यामधील करारनामा :
उपनियंत्रक शिधावाटप व मूळ शिधावाटप दुकानदार यांच्यामध्ये रु. ५००/- च्या मुद्रांक कागदावर नोंदणीकृत करारनामा करण्यात यावा. करारनाम्याचा नमुना या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट- ब मध्ये देण्यात आला आहे.
वितरण व ठिकाणे :
फिरत्या शिधावाटप दुकानास धान्य वितरणासाठी दोन ते तीन ठिकाणे ठरवून द्यावयाची असल्याने संबंधित क्षेत्रातील शिधावाटप अधिकारी ठरवून देतील त्या त्या दिवशी त्या त्या ठिकाणी फिरत्या शिधावाटप दुकानाद्वारे वितरण होईल, याची संबंधित शिधावाटप दुकानदार व मूळ शिधावाटप दुकानदार यांनी दक्षता घ्यावयाची आहे.
धान्य वितरणाची वेळ :
धान्य वितरणाची वेळ ही स्थानिक परिस्थितीला अनुसरून संबंधित विभागातील पोलीस विभाग (वाहतूक) यांच्याशी चर्चा करून ठरवावी. वर्दळीच्या वेळेचा अंदाज घेऊन वाहतुकीस अडचण होणार नाही व लाभार्थ्यांचीही सोय होईल यादृष्टीने वितरणाची वेळ निश्चित करावी.
प्राधिकृत व्यक्ती :
मूळ शिधावाटप दुकानदार यांनी फिरत्या शिधावाटप दुकानात धान्य वाटपाकरिता उपस्थित राहणाऱ्या व्यक्तीस त्यांच्यातर्फे प्राधिकृत करत असल्याबाबत सहमती रु.१००/- चा मुद्रांक कागदावर शिधावाटप अधिकारी यांना प्रस्तावासोबत देणे अनिवार्य राहील.
वाहन क्षमता –
फिरते शिधावाटप दुकानासाठी ६ ते १० मेट्रिक टन क्षमतेचे वाहन असावे.
शिधारथ फलक :
फिरत्या शिधावाटप दुकानावर शासनामार्फत ठरवून देण्यात आलेला “शिधारथ” चा फलक लावणे आवश्यक आहे.
या व्यतिरिक्त अन्य कोणताही खाजगी मजकूर छापता येणार नाही. वाहन वित्तीय संस्थेमार्फत कर्ज घेऊन खरेदी केले असेल तर त्या वित्तीय संस्थेमार्फत कर्ज घेऊन वाहन खरेदी केल्याचा मजकूर शासाने निश्चित केलेल्या फॉन्ट मध्ये छापता येईल.
माहिती फलक :
फिरत्या शिधावाटप दुकानांमध्ये प्रमुख ठिकाणी लाभार्थीचे हक्क दर्शविणारे छपाई केलेले माहिती फलक प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
ई-पॉस मशीन :
फिरत्या शिधावाटप दुकानाकरिता स्वतंत्र ई-पॉस मशिन आवश्यक राहील.
वजन काटा :
फिरते शिधावाटप दुकानामध्ये शासनाच्या वजन व मापे यंत्रणेकडून प्रमाणित केलेला इलेक्ट्रॉनिक वजन काटा असावा. याकरिता लागणा-या वीज जोडणीची व्यवस्था वाहनामध्ये असावी.
धान्याचा साठा आवक व साठवणूक :
धान्याची आवक ही थेट वाहतुकीद्वारे मूळ शिधावाटप दुकानात होईल व धान्याची साठवणूक ही मूळ शिधावाटप दुकानात स्वतंत्र व्यवस्था करून करण्यात येईल. मूळ फिरत्या शिधावाटप दुकानातून फिरत्या शिधावाटप दुकानामध्ये धान्याचा साठा वर्ग केला जाईल.
नोंदवह्या :
१) फिरत्या शिधावाटप दुकानासाठी स्वतंत्र साठा नोंदवही ठेवावी. या साठा नोंदवही मध्ये वर्ग केलेला साठा, फिरत्या शिधावाटप दुकानातून विक्री झालेला धान्य साठा, पुन:श्च मूळ दुकानात वर्ग केलेला धान्य साठा व शिल्लक धान्य साठा असा सर्व तपशील ठेवावा.
२) इतर आवश्यक नोंदवह्या देखील फिरत्या शिधावाटप दुकानामध्ये ठेवण्यात याव्यात.
कमिशन:
फिरत्या शिधावाटप दुकानाद्वारे वाटप करण्यात येणाऱ्या धान्याचे कमिशन मूळ शिधावाटप दुकानदार यांना मिळेल.
लाभार्थ्यांसाठी व्यवस्था :
(१) फिरते शिधावाटप दुकानदार यांनी धान्य वाटपाच्या ठिकाणी उन्हापासून व पावसापासून शिधापत्रिकाधारकांना संरक्षण मिळण्याकरिता तात्पुरती व्यवस्था करावी.
२) धान्य घेण्यास येणाऱ्या लाभार्थ्यांची रांग लावणेची व शिस्त पाळण्याची जबाबदारी फिरते शिधावाटप दुकानदार यांची राहील.
पीएम- वाणी : ( (PM-Wi-Fi Access Network Interface) :
सर्व फिरत्या शिधावाटप दुकानदार यांना पीएम-वाणी उपक्रमाबाबत प्रोत्साहित करावे. जेणेकरून फिरती शिधावाटप दुकाने सार्वजनिक वाय-फाय म्हणून देखील कार्यरत राहतील.
फिरत्या शिधावाटप दुकानाच्या कामकाजाचे नियमन :
महाराष्ट्र अन्नधान्य रेशनिंग (द्वितीय) आदेश, १९६६, महाराष्ट्र अन्नधान्य रेशनिंग (द्वितीय) नियमन, १९६६ व बॉम्बे शिधावाटप क्षेत्र अनुसूचित वस्तू (वितरणाचे नियमन) आदेश, १९८६ यांच्या कार्यकक्षेत इतर शिधावाटप दुकानांप्रमाणेच फिरत्या शिधावाटप दुकानांच्या कामकाजाचे नियमन व नियंत्रण केले जाईल.
फिरत्या शिधावाटप दुकानातील अनियमिततेची जबाबदारी :
फिरत्या शिधावाटप दुकानात कोणत्याही प्रकारची अनियमितता झाल्यास किंवा अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ च्या कलम ३ मधील तरतुदींचा भंग झाल्यास सदर अधिनियमाच्या कलम ७ मध्ये नमूद शिक्षा व कारवाईस मूळ शिधावाटप दुकानदार पात्र राहील.
वाहनाचा अन्य कामाकाजासाठी वापर :
१) महिन्याचे १००% टक्के धान्य वितरण पूर्ण झाल्याखेरीज शिधावाटप अधिकारी यांच्या परवानगीशिवाय अन्य वाहतुकीसाठी/ कामकाजासाठी सदर वाहनाचा वापर करता येणार नाही.
२) धान्य वितारणाखेरीज अन्य कामकाजासाठी वाहनाचा वापर केल्यास, अशा वेळी वाहनाशी संबंधित सर्वच बाबींची जबाबदारी पूर्णपणे वाहन मालकाची असेल.
३) वाहनाच्या अन्य वापरासंबंधी निगडीत कोणत्याही बाबीसाठी शासन तसेच मुंबई-ठाणे शिधावाटप यंत्रणा कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.
परिवहन विभागाच्या अटी व शर्ती:
फिरते शिधावाटप दुकानाच्या प्राधिकारपत्रधारकांनी फिरत्या शिधावाटप दुकानाकरिता वापरण्यात येणाऱ्या वाहनाकरिता परिवहन विभागाच्या खालील अटी व शर्तीचे पालन करणे व आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक आहे-
१) स्थायी अनुज्ञप्ती –
वाहन चालकाकडे योग्य ती वाहन चालविण्याची स्थायी अनुज्ञप्ती ( Driving License) असावी.
२) मोबाईल कॅन्टीन –
वाहनात अनुषंगिक बदल करण्याकरिता वाहनाचा प्रकार निवडताना “मोबाईल कॅन्टीन” हा प्रकार निवडण्यात यावा. त्याकरिता परिवहन विभागाचे एक वेळचे शुल्क रु. ७५०/- भरून वाहनात करावयाच्या बदलाची परवानगी घेण्यात यावी.
३) जाहिरात शुल्क –
अशासकीय वाहनांचा वापर शासकीय कामकाजाकरिता करण्यात येणार असल्याने वाहनावर प्रदर्शित करण्यात येणाऱ्या शासकीय जाहिरातीसाठी परिवहन विभागाचे शुल्क रु. २०००/- प्रति वर्ष प्रति वाहन हे फिरते शिधावाटप दुकानाचे प्राधिकारपत्रधारक यांनी वाहनधारकामार्फत परिवहन विभागास भरणे आवश्यक आहे.
४) स्थानदर्शक उपकरण –
वाहनामध्ये स्थानदर्शक उपकरण अर्थात जी. पी. एस. (ए आय एस १४० या मानकांनुसार प्रमाणित व्हेइकल लोकेशन अँड ट्रॅकिंग डिव्हाईस (VLTD)) बसविणे अनिवार्य आहे.
५) भाडेकरारनामा-
वाहन भाडेतत्वावर असल्यास वाहन मालक व मूळ शिधावाटप दुकानदार भाडेकरारनामा झालेला असावा.
पोलीस (वाहतूक) विभागाच्या अटी व शर्ती:
फिरते शिधावाटप दुकानाच्या प्राधिकारपत्रधारकांनी पोलीस (वाहतूक) यांच्या खालील अटी व शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे –
१) शिधावाटप अधिकारी आणि पोलीस अधिकारी (वाहतूक) यांनी फिरते शिधावाटप दुकान उभे करण्याच्या जागा ठरविताना वाहतुकीला अडचण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
२) पोलीस (वाहतूक) यांच्याकडून ठरवून दिलेल्या (पाहणी केलेल्या) ठिकाणीच फिरते शिधावाटप दुकान उभे करावे. फिरत्या शिधावाटप दुकानाची जागा बदलण्यात येऊ नये.
३) भविष्यात उद्भवणाऱ्या काही अपरिहार्य कारणास्तव जागा बदलने आवश्यक झाल्यास, संबंधित वाहतूक विभाग यांच्या समवेत नवीन ठिकाणाची पुनश्च पाहणी करावी.
४) फिरते शिधावाटप दुकान उभे करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणी रस्त्यावर मार्किंग करून फलक लावण्यात यावेत.
५) फिरते शिधावाटप दुकान मुख्य रस्त्यावर उभे करण्यात येऊ नये .
६) फिरते शिधावाटप दुकानाचा दरवाजा फुटपाथच्या दिशेने उघडेल याची दक्षता घ्यावी.
७) धान्य घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांच्या रांगा रस्त्यावर न लागता फुटपाथ वर राहतील, याची दक्षता घ्यावी.
८) धान्य वाटप करण्याच्या कालावधीमध्ये व वेळेदरम्यान अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका, बेस्ट बसेस यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग : रेशन आपल्या दारी : मुंबई- ठाणे शिधावाटप क्षेत्रात फिरते शिधावाटप दुकान “ शिधारथ” मार्फत अन्नधान्य वितरण करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – नवीन रेशनकार्ड किंवा रेशनकार्ड रास्तभाव दुकानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!