१ मे, महाराष्ट्र दिनी राज्यातील गावागावात, झेंडा वंदनाच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहितीपत्रिका पोहोचणार
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सपूर्ण महाराष्ट्रात येत्या १ मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सामाजिक न्यायाचा जागर करण्याची अभिनव संकल्पना अंमलात आणली असून यासंदर्भातील शासन निर्णय सामाजिक न्याय विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.
या शासन निर्णयानुसार दि. १ मे, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सबंध राज्यात झेंडा वंदनाच्या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारी माहितीपत्रिका किंवा माहिती पुस्तिका वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यांच्या ठिकाणी त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय, ग्रामीण भागात लोकप्रितिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या मार्फत या योजनांचे संक्षिप्त स्वरूपात वाचनही करण्यात येणार आहे.
यावर्षी देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे, सामाजिक न्याय विभागाने राज्य निर्बंध मुक्त होताच धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ११ दिवस विविध उपक्रम आयोजित करून साजरी केली.
राज्य सरकारने दोन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केला असून, या कालावधीत धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून सामाजिक न्याय विभागाच्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये कालानुरूप सकारात्मक बदल केले आहेत. त्या बदलांचे सकारात्मक परिणाम लाभार्थींच्या टक्केवारीत दिसून येत आहेत. अनेक योजना नाविन्यपूर्ण रीतीने राबविणे, नवीन काही योजना अंमलात आणणे, याद्वारे विभागाच्या कार्याचा एक वेगळा ठसा या काळात उमटवला आहे.
अनुसूचित जाती, नवबौद्ध घटक यांसह समाजातील आर्थिक दुर्बल व मागास घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या अनेक योजना कार्यरत आहेत, या योजनांच्या बाबतीत जनजागृती करून तळागाळातील गरजूंना लाभ मिळवून देणे हा यामागचा उद्देश असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान दि. 01 मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झेंडावंदन होणाऱ्या सर्व शासकीय आस्थापनांच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, बॅनर्स लावणे तसेच माहितीपत्रिका वाटप करणे यासाठी विभागाने नियोजन केले असून, समाज कल्याण आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्त तसेच महासंचालक, बार्टी यांच्या मार्फत या अभिनव उपक्रमाची येत्या महाराष्ट्र दिनी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
दिनांक ०१ मे, २०२२ (महाराष्ट्र दिन) या दिवशी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन:
दिनांक ०१ मे, २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. कोविङ -१९ या महामारीमुळे मागील २ वर्षे संपूर्ण जग, देश आणि राज्य या महामारीला सामोरे गेले आणि जग, देशाबरोबरच आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊन झाला होता. मागील दोन वर्षापासून आपण सर्व कोरोनाच्या निर्बंधांमध्ये होतो. आता ३१ मार्च, २०२२ रोजी पासून राज्य निर्बंधमुक्त झालेले आहे. या पार्श्वभूमीवर साजरा होणाऱ्या महाराष्ट्र दिनादिवशी खालीलप्रमाणे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांना मिळावी व त्याची व्याप्ती वाढावी, यासाठी छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजन करण्याची बाब विचाराधीन होती. याबाबत आता खालीलप्रमाणे निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
महाराष्ट्र दिन ०१ मे, २०२२ रोजी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांना मिळावी व त्याची व्याप्ती वाढावी, यासाठी खालीलप्रमाणे छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
1. जिल्ह्यात शासनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो त्याठिकाणी व राज्याचा मुख्य कार्यक्रम असतो तेथे सामाजिक न्याय विभागाचा स्टॉल उभारण्यात यावा.
2. सामाजिक न्याय विभागाच्या स्टॉलच्या मागे विभागाचे नाव दर्शविणारे बॅनर, ज्यावर शासनाच्या धोरणाप्रमाणे मा.मुख्यमंत्री, मा. उप मुख्यमंत्री, मा.मंत्री (सामाजिक न्याय) व मा.राज्यमंत्री (सामाजिक न्याय) महोदय यांची छायाचित्रे असावीत.
3. सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यान्वित असलेल्या योजनांची माहिती असणारे संक्षिप्त बॅनर कार्यक्रमाच्या ठिकाणी आवश्यक त्या परवानगीने लावण्यात यावे.
4. आयुक्त, समाज कल्याण, आयुक्त, दिव्यांग कल्याण, महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी), पुणे तसेच विभागांतर्गत कार्यरत सर्व महामंडळांचे महाव्यवस्थापक यांनी पत्रके छापून घ्यावीत आणि त्यांचे वाटप करण्यात यावे.
5. आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांनी विभागाच्या वतीने समाज कल्याण आयुक्तालय, दिव्यांग आयुक्तालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), विभागांतर्गत कार्यरत महामंडळे या सर्वांची माहिती देणाऱ्या ४ – fold माहितीपत्रकाची छपाई करावी व ही माहितीपत्रके सर्व ग्रामपंचायत, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका येथे वाटपासाठी पाठविण्यात यावीत. तसेच त्यादिवशी ग्रामीण भागात जेथे शासकीय झेंडावंदनाचा कार्यक्रम होतो, त्याठिकाणी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, मुख्य अधिकारी इत्यादि यांनी झेंडावंदनाच्या कार्यक्रमानंतर सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे संक्षिप्त वाचन करावे.
6. शासकीय कार्यक्रमात मा. पालकमंत्री यांचे हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम होतो त्याठिकाणी मा.पालकमंत्री यांनी सामाजिक न्याय विभागाच्या ठळक योजनांचा उल्लेख त्यांच्या भाषणात करावा. त्यासाठी आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांनी भाषणात घ्यावयाच्या योजनांची नावे/माहिती संक्षिप्त स्वरूपात मा. पालकमंत्री यांना उपलब्ध करावी.
7. या सर्व कामात आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत क्षेत्रीय स्तरावर उपलब्ध केलेले कर्मचारी/अधिकारी यांची मदत घ्यावी. त्यासाठी महासंचालक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी), पुणे यांनाही सर्व सूचना द्याव्यात.
8. कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या बॅनरवर आणि माहितीपत्रकावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा लोगो छापण्यात यावा.
9. या कामासाठी प्रति जिल्हा रु .१०,०००/- सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण व रु. १.४० लक्ष आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांनी उपलब्ध करून द्यावेत.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय: दिनांक ०१ मे, २०२२ (महाराष्ट्र दिन) या दिवशी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – विधवा, अपंग व निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज (Special Assistance scheme)
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!