वृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

११ वी प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२२ – CET परीक्षा वेळापत्रक जाहीर ! परीक्षा शुल्क, अभ्यासक्रम संपूर्ण माहिती – 11th Std Admission

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल दि. २८ मे. २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार दि.१६/०७/२०२१ रोजी जाहीर करण्यात आलेला आहे.

शासन निर्णय दि.२८ मे, २०२१ व दि.२४ जून, २०२१ नुसार इ.११ वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आयोजित करण्याचा निर्णय होऊन त्याचा तपशील निश्चित केलेला असून सदर परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत.

त्या अनुषंगाने सन २०२१-२२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत शनिवार दि.२१ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या कालावधीत करण्यात येणार आहे. सदर परीक्षा ही राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील सन २०२१-२२ मधील इ.११ वी प्रवेशासाठी असून ती विद्यार्थ्यासाठी पूर्णतः ऐच्छिक स्वरुपाची आहे. सदर परीक्षा ही ऑफलाईन स्वरुपाची असून ती राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची (Multiple Choice Objective type Questions) व O.M.R. आधारीत असेल. या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण/प्रविष्ट झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या https://cet.11thadmission.org.in/ या संकेतस्थळावरुन आवेदनपत्र सादर करणे आवश्यक आहे. आवेदनपत्र भरण्याची सुविधा मंडळामार्फत दि.२०/०७/२०२१ रोजी सकाळी ११.३० पासून दि.२६/०७/२०२१ अखेर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर आवेदनपत्र भरण्यासंदर्भात तसेच सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी तपशीलवार सूचना सदर प्रकटनासोबत तसेच मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तरी, याची विद्यार्थी, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी.

>

इ.११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा सन २०२१ विद्यार्थ्यांसाठी सूचना:

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचेकडील उपरोक्त शासन निर्णय संदर्भ क्र. १ व २ नुसार सन २०२१-२२ या वर्षासाठी इ.११ वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षेचे स्वरुप, अभ्यासक्रम, विषय, एकूण गुण, वेळ, शुल्क व इतर अनुषंगिक बाबी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. तसेच संदर्भ क्र. ३ मधील शासन पत्रानुसार सदर परीक्षेची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उपरोक्त बाबी विचारात घेऊन मंडळामार्फत इ.११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा सन २०२१ चे आयोजन करण्यात येत असून त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे.

परीक्षेचे सर्वसाधारण स्वरुप:

१. इयत्ता ११ वी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळांच्या (राज्य मंडळ, C.B.SE, C.I.S.C.E., सर्व आंतररष्ट्रीय मंडळे इत्यादी) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ .१० वी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण/प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येईल.

२. सदर परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक असेल.

३. इयत्ता ११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा ही राज्यमंडळाच्या इ.१० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.

४. सदर परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका/पेपर असेल व परीक्षेचा कालावधी दोन तासांचा राहील.

५. सदर परीक्षेची प्रश्नपत्रिका आठ माध्यमातून उपलब्ध असतील. विद्यार्थ्याने सदर परीक्षेच्या आवेदनपत्रात नोंदविलेल्या माध्यमानुसार त्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येईल.

६. सेमी इंग्रजी या माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी आवेदनपत्रात निश्चित केलेल्या इंग्रजी व इतर माध्यमाचा विचार करुन प्रश्नपत्रिका पुरविण्यात येईल.

७. सदर सामाईक प्रवेश परीक्षा ही ऑफलाईन स्वरुपाची असेल. यासाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective type Questions) असेल.

परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप, विषय, माध्यम व अभ्यासक्रम:

१. इ. ११ वी सामायिक प्रवेश परीक्षा ही राज्यमंडळाच्या इ.१० वीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या चार विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.

२. सदर परीक्षेच्या १०० गुणांच्या एकाच प्रश्नपत्रिका/पेपरमध्ये उपरोक्त चार विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे १०० प्रश्न असतील. सदर गुणविभागणीचा तपशिल खालीलप्रमाणे.

अभ्यासक्रम
गुणविभागणी

३. विद्यार्थ्याने सदर परीक्षेच्या आवेदनपत्रात नोंदविलेल्या माध्यमानुसार त्याला पुढील आठ माध्यमांपैकी एक/दोन माध्यमातील प्रश्नांचा समावेश असलेली प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येईल. १. इंग्रजी २. मराठी ३. गुजराती ४. कन्नड ५. उर्दू ६. सिंधी ७. तेलुगु ८. हिंदी सेमी इंग्रजी या माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांचे प्रश्न इंग्रजी माध्यमातून आणि सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयाचे प्रश्न विद्यार्थ्याने आवेदनपत्रात नमूद केलेल्या अन्य माध्यमातून उपलब्ध असतील.

४. सदर ऑफलाईन परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective type Questions) असेल.

५. शासन निर्णयात निश्चित केल्याप्रमाणे राज्यमंडळाच्या इ.१० वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी निश्चित केलेल्या चार विषयांच्या अभ्यासक्रमातील घटकांचा तपशिल सोबतच्या परिशिष्ट – अ मध्ये देण्यात आलेला आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये सदर घटकांवर आधारीत प्रश्नांचा समावेश असेल.

६. कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ साठी विषयनिहाय २५% अभ्यासक्रम/घटक-उपघटक वगळण्यात आलेले आहेत. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सदर वगळलेल्या भागांवर आधारीत प्रश्न समाविष्ट नसतील.

आवेदनपत्र सादर करणे.

१. इ. ११ वी सामायिक प्रवेश परीक्षा ही वैकल्पिक/ऐच्छिक स्वरूपाची असल्याने या परीक्षेस प्रविष्ट होवू इच्छिणाऱ्या विद्याथ्याने परीक्षेसाठी स्वतंत्र आवेदनपत्र भरणे आवश्यक असेल.

२. सदर आवेदनपत्र भरण्यासाठी मंडळाच्या https://cet.11thadmission.org.in/ या अधिकृत संकेस्थळावर जाऊन विद्यार्थ्याने प्रथम इ.१० वीला प्रविष्ट झालेल्या मंडळाचा प्रकार निवडावा. तद्नंतर विद्यार्थ्यांना त्यावर दिलेल्या सूचनांचे वाचन करुन त्याप्रमाणे कार्यवाही करावी लागेल.

३. सदर सूचना वाचून त्या स्विकृत असलेबाबत संबंधित रकान्यात खूण (1) करावी.

राज्यमंडळामार्फत सन २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा उत्तीर्ण/प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी:

१. विद्यार्थ्याने प्रथम संगणक प्रणालीमध्ये स्वतःचा बैठक क्रमांक व आईचे नाव याबाबतची इत्यादी माहिती भरावी. सदर माहिती सादर (Submit) केल्यानंतर उर्वरित रकान्यातील माहिती आपोआप भरली जाईल. विद्यार्थ्याने दिलेल्या रकान्यात त्याचा ई – मेल आयडी (उपलब्ध असल्यास) भरावा.

२. विद्यार्थ्याला परीक्षेसाठी माध्यमाची निवड करण्याचा विकल्प देण्यात आलेला आहे. इ. १० वीच्या परीक्षेचे माध्यमाप्रमाणे या परीक्षेसाठीचे माध्यम त्याने सदर रकान्यात निश्चित करावे. विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापि, सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यास इ.१० वीच्या माध्यमानुसार उर्वरित अन्य ७ माध्यमांपैकी एक माध्यम निश्चित करावे लागेल.

३. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या/कायमच्या निवास स्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका/शहराचा विभाग निश्चित करण्याचा विकल्प देण्यात येईल, तो विद्यार्थ्यांनी निश्चित करावा. सदर परीक्षेला प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सदर विद्यार्थ्याने निवडलेल्या तालुक्यासाठी/शहरी विभागासाठी मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रापैकी कोणतेही एक केंद्र विद्यार्थ्याला परीक्षेसाठी देण्यात येईल.

४. उपरोक्तप्रमाणे माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्र सादर (Submit) करावे. तद्नंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्राची प्रिंट काढून जतन करुन ठेवावी.

५. उपरोक्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी वेगळे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

अन्य मंडळांमार्फत तसेच राज्यमंडळामार्फत (सन २०२१ पूर्वी) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा उत्तीर्ण/प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी:

१. विद्यार्थ्याने संगणक प्रणालीमध्ये दिलेल्या सर्व रकान्यातील माहिती अचूक भरावी.

२. विद्यार्थ्याला परीक्षेसाठी माध्यमाची निवड करण्याचा विकल्प देण्यात आलेला आहे. इ. १० वीच्या परीक्षेचे माध्यमाप्रमाणे या परीक्षेसाठीचे माध्यम त्याने सदर रकान्यात निश्चित करावे. विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापि, सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यास इ.१० वीच्या माध्यमानुसार उर्वरित अन्य ७ माध्यमांपैकी एक माध्यम निश्चित करावे लागेल.

३. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या/कायमच्या निवास स्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका/शहराचा विभाग निश्चित करण्याचा विकल्प देण्यात येईल, तो विद्यार्थ्यांनी निश्चित करावा. सदर परीक्षेला प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सदर विद्यार्थ्याने निवडलेल्या तालुक्यासाठी/शहरी विभागासाठी मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रापैकी कोणतेही एक केंद्र विद्यार्थ्याला परीक्षेसाठी देण्यात येईल.

४. सदर विद्यार्थ्यांबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी ओळख पडताळणीसाठी फोटो आयडी (शाळेचे ओळखपत्र, आधार कार्ड, इ.) पासपोर्ट साईझ फोटो व स्वाक्षरी नमूना संगणक प्रणालीवर अपलोड करणे अनिवार्य राहील.

५. दिव्यांग विद्यार्थ्यांनी आवेदनत्रात दिव्यांगत्वाचा प्रकार निवडून निश्चित करावा तसेच त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे संगणक प्रणालीवर अपलोड करावीत.

६. उपरोक्तप्रमाणे माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्र सादर (Submit) करावे. तदनंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्राची प्रिंट काढून जतन करुन ठेवावी.

७. उपरोक्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी मंडळाने विहित केलेले शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरावे लागेल.

परीक्षा शुल्क:

इ.११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा सन २०२१ साठी प्रविष्ट होणाऱ्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना (सन २०२१ च्या नियमित परीक्षेला नोंदणी केलेल्या) परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही.

मात्र सन २०२१ पूर्वी राज्यमंडळातून इ.१० वीची परीक्षा उत्तीर्ण/प्रविष्ट झालेले विद्यार्थी, C.B.S.E., C.I.S.C.E., सर्व आंतररष्ट्रीय मंडळे इत्यादी अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाने विहित केल्याप्रमाणे प्रत्येकी रु.१७८/- शुल्क उपलब्ध करुन दिलेल्या पर्यायाद्वारे ऑनलाईन भरणे आवश्यक राहील. त्यासाठी Debit/ Credit card/UPI/Net Banking व तत्सम पर्याय उपलब्ध करुन दिले जातील, त्यापैकी एका पर्याया द्वारे शुल्क भरावे.

परीक्षा केंद्र:

१. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र निश्चित करताना त्याने आवेदनपत्रामध्ये नमूद केलेला जिल्हा व तालुका/शहरी भाग विचारात घेण्यात येईल.

२. विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रासाठी निश्चित केलेल्या तालुक्यामधून सदर परीक्षेसाठी प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन त्या तालुक्यासाठी मंडळामार्फत परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येतील. त्यापैकी एक केंद्र विद्यार्थ्याला देण्यात येईल.

प्रवेशपत्र:

विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मंडळामार्फत ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन दिले जाईल. सदर प्रवेशपत्र विद्यार्थ्याने डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून घ्यावी. प्रवेशपत्रावर दिलेल्या सर्व सूचना विचारात घेऊन विद्यार्थ्याने परीक्षेस प्रविष्ट व्हावे. सदर प्रवेशपत्रावर विद्यार्थ्याची माहिती सदोष असल्यास अथवा फोटो नसल्यास यासंदर्भातील माहिती पुस्तिकेत दिलेल्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी.

परीक्षेचे आयोजन व कार्यवाही:

१. परीक्षेचे आयोजन मंडळाने निश्चित केलेल्या माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांवर करण्यात येईल.

२. सदर परीक्षा शनिवार दि.२१/०८/२०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या कालावधीत घेण्यात येईल.

३. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांने परीक्षा केंद्रावर किमान एक तास अगोदर उपस्थित रहावे. तसेच कोविड -१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करावे.

४. परीक्षा केंद्रावर व परीक्षे दरम्यान सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे. कोणताही गैरमार्ग प्रकार निदर्शनास आल्यास विद्यार्थी निर्धारित शास्तीस पात्र राहील.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुविधा

१. सामाईक प्रवेश परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी करुन परीक्षेस मागणीनुसार लेखनिक/जादा वेळेची सवलत देय राहील.

२. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी याबाबतची कागदपत्रे पडताळणीसाठी परीक्षा केंद्रसंचालकांच्या मागणीनुसार उपलब्ध करुन दयावीत.

३. अशा विद्यार्थ्यांना स्वतंत्र बैठक व्यवस्थेची आवश्यकता असल्यास त्याची मागणी केंद्रसंचालकाकडे किमान दोन दिवस अगोदर नोंदवावी.

उत्तरपत्रिकेवर उत्तराची नोंद करणे- कार्यपध्दती

१. सदर परीक्षेसाठी O.M.R. आधारीत उत्तरपत्रिका असेल व त्यासोबत परीक्षेनंतर विद्यार्थ्यास परत करावयाची कॉर्बन प्रत संलग्न असेल. उत्तरपत्रिकेमध्ये क्रमांक १ ते १०० प्रश्नांची उत्तरे नोंदविण्यासाठी प्रत्येक प्रश्नक्रमांकासमोर A, B, C, D अशा चार पर्यायांचे गोल देण्यात आलेले आहेत.

२. उपरोक्त चार पर्यायांपैकी विद्यार्थ्याने निश्चित केलेल्या उत्तराचा एकच गोल ठळकपणे भरावा.

३. गोल भरण्यासाठी काळया किंवा निळया यापैकी एकाच शाईच्या बॉलपेनचा वापर करावा. तसेच सदर पर्यायी उत्तराच्या वर्णाक्षराचा गोल पूर्णपणे भरण्याची (गडद करणे) दक्षता घ्यावी.

४. अर्धवट भरलेला, खाडाखोड केलेला, एका पेक्षा जास्त भरलेले गोल तसेच गोलात अंक अथवा तत्सम मजकूर नमूद केलेले असल्यास उत्तरांसाठी ग्राह्य धरले जाणार नाही व त्यासाठी गुणदान केले जाणार नाही. तसेच एकदा लिहिलेले उत्तर बदलता येणार नाही.

५. उत्तरपत्रिकेची संगणकीय पध्दतीने तपासणी केली जाणार असल्याने सदर उत्तरपत्रिकेची घडी घालू नये, चुरगळू नये अथवा अन्य कोणत्याही कारणाने खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी.

६. उत्तरे लिहिण्यापूर्वी काही कच्चे काम करावयाचे असल्यास प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिलेल्या पानांवर कोऱ्या जागेचाच वापर करावा.

७. विद्यार्थ्यास परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिकेची कॉर्बन प्रत तसेच मंडळाच्या संकेतस्थळावर अंतिम उत्तरसूची उपलब्ध करुन दिली जाणार असल्याने निकालानंतर गुणपडताळणी अथवा फेरतपासणीची सुविधा उपलब्ध असणार नाही.

नमूना उत्तरसूची प्रसिध्दी व आक्षेप नोंदविणे:

परीक्षेनंतर नमूना उत्तरसूची मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. यासंदर्भात आक्षेप असल्यास ते विहित मुदतीत नोंदविणे आवश्यक राहील. आक्षेप नोंदविण्यासाठी कालावधी निश्चित करुन तो नमूना उत्तरसूची सोबत प्रसिध्द करण्यात येईल.

आक्षेपांचे निराकरण व अंतिम उत्तरसूची जाहीर करणे

नमूना उत्तरसूचीवर प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेऊन त्याबाबतची मंडळ स्तरावर पडताळणी करण्यात येईल. सर्व आक्षेपांची खातरजमा केल्यानंतर मंडळामार्फत अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात येईल.

निकाल जाहीर करणे व गुणपत्रक:

अंतिम उत्तरसूची जाहीर केल्यानंतर निकालाबाबत मंडळ स्तरावरील कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. तद्नंतर मंडळाने निश्चित केलेल्या तारखेस निकाल जाहीर करुन ऑनलाईन गुणपत्रक विद्यार्थ्यांना देण्यात येईल.

इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात सन २०२१ साठी सामाईक प्रवेश परीक्षा- विषयनिहाय घटक:

इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात सन २०२१ साठी सामाईक प्रवेश परीक्षा- विषयनिहाय घटक PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु – 2021

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.