१७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव:’ मोहीम !
देशभरात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत ‘आयुष्मान भव:’ मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार असून राज्यस्तरावर या मोहिमेचा कार्यारंभ सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.
धर्मादाय रूग्णालयांविषयीचे आरोग्य आधार ॲप व राज्यातील खासगी आरोग्य संस्थांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲप, आरोग्यवर्धिनी केंद्रामधील कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी यांची दैनंदिन उपलब्धता तसेच कामावर आधारित मोबदल्याची अदायगी याचे सनियंत्रण करण्याकरीता समुदाय आरोग्य अधिकारी ॲप यांची राज्यस्तरावर सुरूवात मोहिमेच्या कार्यारंभ सोहळ्यावेळी करण्यात येणार आहे.
सर्व जिल्ह्यांमध्ये मोहीम राबविण्यात येणार असून गावपातळीपर्यंत गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा पुरविणे व जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मोहिमेदरम्यान आयुष्मान आपल्या दारी 3.0, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, रक्तदान मोहिम, अयवयदान जागृती मोहिम, स्वच्छता मोहिम, वय वर्ष 18 वरील पुरूषांची आरोग्य तपासणी मोहिम उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान ‘आयुष्मान भव:’ सेवा पंधरवाडाही राबविण्यात येईल.
‘आयुष्मान आपल्या दारी’ अंतर्गत पात्र लाभार्थींचे आयुष्मान कार्ड नोंदणी व वितरण, स्वयं नोंदणीसाठी जनतेला प्रोत्साहित करणे, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यांचे संयुक्त कार्डचे वितरण करण्यात येणार आहे.
आयुष्मान सभेचे 2 ऑक्टोंबर रोजी ग्रामसभेच्या स्वरूपात आयोजन करण्यात येणार आहे. आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर आयुष्मान मेळाव्याचे आयोजन दर आठवड्याला शनिवारी करण्यात येणार आहे.
मेळाव्यामध्ये पहिल्या आठवड्यात असंसर्गजन्य आजार तपासणी, निदान व उपचार, दुसऱ्या आठवड्यात क्षयरोग, कुष्ठरोग व इतर असंसर्गजन्य आजार तपासणी, निदान व उपचार, तिसऱ्या आठवड्यात माता, बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा, चौथ्या आठवड्यात सिकलसेल तपासणी व नेत्र रोग चिकित्सा, कान, नाक व घसा तपासणी होईल. या सर्व मेळाव्यांदरम्यान 18 वर्ष व अधिक वयोगटातील पुरूषांची आरोग्यविषयक सर्वंकष तपासणी करण्यात येणार असून ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालय येथे दर आठवड्याला आरोग्य मेळावा पार पडणार आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना – CM Medical Assistance Fund Scheme
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!